रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याला सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने झोडपलं आहे. गेल्या चौविस तासात रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल सरासरी ११२ मिलिमिटर पाऊस पडला आहे. गेेले काही दिवस पावसाचा लपंडाव सुरू होता. पण गेल्या तीन दिवसांपासून मात्र पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे.
दरम्यान गेल्या 24 तासांत सर्वात जास्त पाऊस दापोली तालुक्यात पडला असून दापोलीत २१० मिलिमिटर पाऊस पडला आहे. त्याखालोखाल मंडणगडमध्ये १२७ मिलिमिटर, खेडमध्ये १२४ मिलिमिटर, चिपळूणात १०५ तर रत्नागिरीत १०० मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान सलग पडणाऱ्या या पावसामुळे बळीराजा सुखावला असून आता शेतीच्या कामांना वेग येणार आहे.
झाड कोसळून घराचं नुकसान
दरम्यान काही ठिकाणी या पावसामुळे नुकसानही झालं आहे. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडंही कोसळली आहेत.
रत्नागिरी शहरातील टिळक आळी परिसरातील फडके यांच्या कौलारू घरावर रात्री चिंच आणि फणसाचे भलेमोठे झाड या पावसामुळे कोसळले. यावेळी घरात माणसं होती. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घराचं मोठं नुकसान झालं आहे. नगरपरिषदेचे कर्मचारी हे झाड बाजूला करण्याचा प्रयत्न दिवसभर करत होते..