रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. मध्यरात्री सोसाट्याचा वारा आणि विजांच्या गडगडाटासह पावसाने बरसात केली. बुधवारी दुपारनंतर पावसाने जोर धरला आणि चांगलीच बरसात केली होती. त्यानंतर आज पुन्हा पावसाने संपूर्ण जिल्ह्यात दमदार सलामी दिली. त्यामुळे खऱ्या अर्थाने जिल्ह्यात मान्सून दाखल झाल्याचं चित्र होतं. गेले काही दिवस पावसाचा लपंडाव सुरू होता. पाऊस लांबल्याने शेतकऱ्याने पेरण्याही उशिरा केल्या. मध्यंतरी पावसाने चांगली हजेरी लावली होती. पण त्यानंतर मात्र पावसाने जिल्ह्यात पाठ फिरवली होती. अधूनमधून किरकोळ सरी बरसत होत्या. पण शेतीच्या कामांना जसा पाऊस आवश्यक होता, तसा पाऊस काही पडत नव्हता. पण बुधवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने बळीराजा मात्र सुखावला आहे. त्यामुळे आतातरी पावसाने आपला लपंडाव थांबवून अशीच पर्जन्यवृष्टी करावी असं साकडं बळीराजा वरुणराजाला घालत आहे.
दरम्यान गेल्या 24 तासांत जिल्ह्यात एकूण 435 मिलिमीटर पाऊस पडला असून सरासरी 48.33 मिमी पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून रत्नागिरीत गेल्या 24 तासांत 131 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल राजापूरमध्ये 84, तर चिपळूणमध्ये 55 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर गुहागर आणि खेडमध्ये कमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत गुहागरमध्ये 7 मिमी तर खेडमध्ये 16 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
सावधानतेचा इशारा
दरम्यान रत्नागिरी जिल्हयात 29 जून 2019 पर्यंत काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे जनतेने सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.