
मुंबई : जोरदार पावसामुळे आज पुन्हा मुंबई ठप्प झाली. तिन्ही मार्गावरील लोकलसेवा आणि रस्ते वाहतुकीचा याचा फटका बसला. शीव, किंग्ज सर्कल, कांजूरमार्ग, कुर्ला आदी ठिकाणी रेल्वे रुळ पाण्याखाली गेले. रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूकही पूर्णपणे मंदावली होती. परिणामी प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. समुद्राला साधारण अकराच्या सुमारास भरती होती. येत्या २४ तासांत जोरदार पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
आरसीएफ कॉलनी, प्रतीक्षा नगर, मिलन सबवे, अंधेरी सबवे, वांद्रे, गांधी मार्केट, किंग्ज सर्कल, दादर टीटी, हिंदमाता, चेंबूर, शेल कॉलनी, चेंबूर कॉलनी आदी ठिकाणी नेहमीप्रमाणे पाणी साचल्याने वाहतूकीचा बोजवारा उडाला होता. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तुडुंब गर्दी झाली होती.
शहरात ४६, पूर्व उपनगरांत १२ व पश्चिम उपनगरांत ३९ ठिकाणी झाडे व झाडाच्या फांद्या पडल्या. १९ ठिकाणी घराच्या भिंती कोसळल्या. या घटनांत कोणीही जखमी झालेले नाही. शिवाजी नगर गोवंडी येथे एलिगंड शाळेजवळ घरात विजेचा धक्का लागून महम्मद कैयुम काझी (३०) हे जखमी झाले. त्यांना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
हार्बर मार्गावरील वाहतूक १५ ते २० मिनीटे उशिराने सुरु होती. मुंबई महापालिकेने आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
मुंबईला पाणी पुरवठा करणारे तलाव पर्जन्यमान (सेमी मध्ये) : भातसा १९, वैतरणा १४, तुलसी १३, तानसा १२, मध्य वैतरणा ९, विहार ८
















