मुंबई, (निसार अली) : चार दिवस कोसळणार्या पावसाने सोमवारी रात्री मुंबईकरांची झोप उडविली. विश्रांती न घेता सलग ४ ते ५ तास कोसळणारा पाऊस अनेकांसाठी काळरात्र ठरला. सुमारे ४०० मिमी. कोसळलेल्या पावसामुळे दुर्घटना घडल्या. अनेक घरांमध्ये पाणी शिरले. यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. मालाडमध्ये तर मध्यरात्रीच्या सुमारास भिंत कोसळली आणि २० जण त्यात गाडले गेले. येथे बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेतील जखमींची मालाडच्या शताब्दी रुग्णालयात जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारपूस केली. मालाड दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल. जखमींना मदत दिली जाईल. या दुर्घटनेतील कुटुंबियांचे पुनर्वसन केले जाईल. या दुर्घटनेच्या सर्वंकष चौकशीचे आदेश दिले आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मालाड येथील पिंपरी पाडा येथे तीन वर्षांपूर्वी संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. ही भिंत काल रात्रीच्या पावसात कोसळली. त्याखाली २० जणांचा मृत्यू झाला. निकृष्ट बांधकाम असल्याने ती कोसळली, असा आरोप आता केला जात आहे. याप्रकरणी मुंबई महानगर पालिकेकडून चौकशी करून कडक कारवाई केली जाणार आहे.
चांदिवलीत जमीन खचली. त्यामुळे तेथील दोन इमारती रिकाम्या करण्यात आल्या. मध्य-हार्बर-पश्चिम रेल्वेच्या सेवाही कोलमडल्या होत्या. जागोजागी पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीला फटका बसला. मालाड सबवेत पाणी तुंबल्याने एक स्कॅार्पिओ त्यात अडकली. बाहेर पडता न आल्याने दोघांचा मृत्यू झाला. इरफान शेख व गुलशाद शेख अशी त्यांची नावे आहेत.
२४ तासांत कुलाबा येथे ५७१.५ मिमी व सांताक्रुझ येथे ९८२.२ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. कुर्ला येथे राष्ट्रवादीचे नेते प्रवक्ते नबाब मलिक यांच्या घरात शिरलेले पाणी चर्चेला विषय ठरले. कुर्ल्यात दुकाने आणि घरांमध्ये कमरेपर्यंत पाणी भरल्याने पालिकेने नौदलाच्या आयएनएस तानाजी आणि एनडीएफच्या टीमला घटनास्थळी पाचारण केले. दोन्ही पथकानं लाइफ जॅकेट आणि बोटीच्या साहय्याने सुमारे १६०० लोकांना सुरक्षित स्थळी हलविले.
मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी मध्य रेल्वे लोकलसेवा पूर्णपणे कोलमडली होती. सीएसएमटीवरून कर्जतकडे दुपारी 12वाजून 28 मिनिटांनी पहिली लोकल सोडण्यात आली. विशेष लोकल चालविण्यात आल्या. आज शाळा, महाविद्यालय आणि सरकारी, खासगी कार्यालय यांना राज्य सरकारने सुट्टी जाहीर केली.