
मुंबई : पावसाने मुंबईशहरासह उपनगराला झोडपले. पावसाचे आतपर्यंत तीन बळी गेले असून पाच जण गंभीर जखमी झाले. वडाळा, सायन मिलन सबवे, हिंदमाता, घाटकोपर, चेंबूर, भांडुप, मुलुंड, कुर्ला, वांद्रे आदी सखल भागात पाणी साचले. रेल्वेच्या तिन्ही मार्गावर पाणी साचले. रस्ते वाहतूकही खोळंबली. मुंबई शहरात ६७.०३ मिमी, पूर्व उपनगर १२०.४७ मिमी आणि पश्चिम उपनगरांत ९०.२७ मिमी पावसाची नोंद झाली. २४ तासात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रांत शुक्रवारी झालेल्या दमदार पावसाने हजेरी लावली. पाणीसाठ्यात यामुळे वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.
अंधेरी पश्चिम येथे सकाळी पावणे आठच्या सुमारास आण्णा नगर, आरटीओ कार्यालय समोर विजेच्या धक्क्याने काशिमा युडीयार (६०) या महिलेचा मृत्यू झाला. तर गोरेगाव पूर्व येथील दुर्गामाता मंदिराच्या मागे चार जणांना विजेचा धक्का लागला. यातील राजेंद्र यादव (६०), संजय यादव (२४) या दोघांचा मृत्यू झाला तर आशादेवी यादव (५) व दिपू यादव (२४) हे दोघे जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दादर येथील सेनापती बापट मार्गावरील कामगार मैदान येथे संरक्षक भिंत कोसळून तीन जण जखमी झाले. जखमींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. चंद्रकांत तोडवले (३५), विजय नागर (३५) व चेतन ताठे (२८) अशी जखमींची नावे आहेत.
कुलाबा मार्केट, माझगांव, हिंदमाता, सायन, मांटूगा लेबर कॅम्प, चेंबूर, गोवंडी, साकीनाका, मानखूर्द- घाटकोपर लिंक रोड, घाटकोपर, कांजूरमार्ग, वडाळा, अंधेरी, बोरिवली, मालाड, विक्रोळी आदी सखल भागात पाणी साचले. चेंबूरच्या पी. एल. लोखंडे मार्ग, शेल कॉलनी, पाणी साचल्याने काही ठिकाणी वाहतूक वळवली होती. मुलुंड, कांजूरमार्ग, घाटकोपर येथील रेल्वे ट्रकही पाण्याखाली गेल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. पाच ठिकाणी झाडे पडणे, तर शहरांत १, पूर्व उपनगरांत २ व पश्चिम उपनगरांत ६ अशा ९ ठिकाणी शॅार्टसर्किटच्या घटना घडल्या.
पाण्याचा तात्काळ निचरा करण्यासाठी ६१ पंपाचा वापर करण्यात आला. पाणी साचल्याने बेस्ट बसचे प्रमुख मार्गही वळविण्यात आले.

















