डोंबिवली : दडी मारलेल्या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या कल्याण-डोंबिवलीकरांना गुरुवारी झालेल्या जोरदार पावसामुळे हवेतील गारव्याचा आनंद घेता आला. कल्याण-डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. शुक्रवारी सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला होता.
पश्चिमकडील भागशाळा मैदान शेजारी असणाऱ्या डोंबिवली नागरिक सोसायटीमधील गुलमोहराचे मोठे झाड पडले. तर महाराष्ट्र नगर येथे झाडाची मोठी फांदी वीज वितरण कंपनीच्या एसटी लाईनवर पडल्याने काही काळ विद्युत पुरवठा बंद झाला होता. अग्निशमन दलाच्या मदतीने दोन्ही झाडे तोडण्यात आली. तसेच ठाकुर्ली रेल्वे स्थानक दरम्यान पाणी साचल्याने सकाळी रेल्वे प्रवाश्यांना स्थानकावर जाण्यास कसरत करावी लागत होती.
ठाकुर्ली रेल्वे स्थानक जवळील रेल्वे फाटक बंद करून भिंत बांधल्यामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा होत नाही. ही भिंत रेल्वेच्या हद्दीत असुन रेल्वेची मालमत्ता आहे त्यामुळे काम कोणी करायचे या वादात पावसाचे पाणी अडले जाऊन तेथे तळे निर्माण झाले. पावसामुळे कल्याणकडे येणाऱ्या लोकल्स 10 ते 15 मिनिटं उशिराने तर मुंबईकडे जाणाऱ्या लोकल्स 20 ते 25 मिनिटं उशिराने धावत होत्या.
गेल्या वर्षीच्या पावसाच्या हंगामात कल्याण तालुक्यात 2468 मी.मी. पाऊस पडला होता. यावर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली होती. परंतु गेल्या 20-22 दिवसात पावसाने दडी मारल्याने कल्याण-डोंबिवलीकर उकाड्याने हैराण झाले होते. गुरूवारपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली. ठिक-ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना समोर येत आहेत. गेल्या वर्षी 28 जूनपर्यंत 279 मी.मी. पावसाची नोंद झाली होती. मात्र यावर्षी 5.13 मी.मी. पावसाची नोंद झाली आहे.