
रत्नागिरी : दापोली, खेड, चिपळूण, गुहागरला शनिवारी मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. मुसळधार पावसामुळे चिपळूणच्या वशिष्टी आणि खेडमधील जगबुडी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. वाशिष्ठी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने बाजारपुल पाण्याखाली गेला आहे. मुसळधार पावसाने गुहागरमधील पालशेत बाजारपेठेत नदीचे पाणी घुसले आहे. पालशेत बाजारपेठेजवळील पूल पाण्याखाली गेला आहे.
मुसळधार पावसाने खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे खेड शहरात पाणी शिरू लागले आहे. जगबुडी नदी लागत असणाऱ्या खेड मधील मटण – मच्छी मार्केट चा संपर्क तुटला असून मार्केट लगतच्या सहा ते सात दुकानांमध्ये पाणी शिरलं आहे.नदीलगतचा रास्ता देखील पाण्याखाली गेला आहे.
नारंगी नदीने रौद्र रूप धारण केले आहे. त्यामुळे खेड ते सुसेरी मार्ग पाण्याखाली गेला असून चिंचघर, सुसेरी , खारी परिसरातील हजारो हेक्टर भातशेती पाण्याखाली गेली आहे. मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून कोणाही नदीकाठी जाऊ नये असे आवाहन केले आहे.
नारगोळी नदीने ओलांडली धोक्याची पातळी
मुसळधार पावसाने दापोली तालुक्यातील नारगोळी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीचे पाणी चक्क पुलावरून वाहत असल्याने दापोली – गावातले , उन्हवरे , साखरोली रस्ता बंद झाले असून 30 गावाचा संपर्क तुटला आहे. दुपारपासून रस्ता बंद असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली आहे.















