रत्नागिरी (आरकेजी): गेले दोन दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात साथीच्या रोगांचा फैलाव होऊ नये यासाठी आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्यावतीने प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आल्या असून आरोग्य विभागाच्या यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात मागील तीन वर्षात डेंग्यु, चिकुनगुन्या, गॅस्टो, अतिसार, कॉलरा, ताप उद्रेक हिवताप , काविळ, लेप्टोस्पायरोसिस आदी साथींचा उद्रेक झालेल्या गावांमध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे विशेष खबरदारी घेतली जात आहे. या गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर वैद्यकीय पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांनी संभाव्य पुरग्रस्त ठिकाणी तात्काळ भेट देऊन उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. आरोग्य कर्मचारी व पर्यवेक्षक यांनी वेळोवेळी भेट देऊन साथरोग विषयक पाहणे करणे. नियमित सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. या गावांतील दरमहा पाणी नमुने व टी.सी.एल. नमुने गोळा करून पयोगशाळेकडे पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाथमिक आरोग्य केंद्र स्तरावर तालुका स्तरावर व जिल्हा स्तरावर 24 तास वैद्यकीय पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
दरम्यान जोखीमग्रस्त 32, साथ उद्रेक झालेली 22, तर नदीकाठच्या 29 गावांमध्ये खबरदारी घ्यावी असे जि.प.आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
तसेच कोणत्याही गावात वाडी वस्त्यांमध्ये साथरोगांची लागण झाल्याचे आढळून आल्यास नागरिकांनी नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे संपर्क साधावा . जिल्हास्तर व प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या ठिकाणी औषध साठा उपलब्ध असून इमर्जन्सी किट तयार केल्या आहेत. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून परवानगी शिवाय मुख्यालय सोडू नये अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यक त्या ठिकाणी घरोघरी मेडिक्लोर वाटप व आरोग्य शिक्षण कार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.