रत्नागिरी : रत्नागिरीतील भाट्ये समुद्र किनारी हॉकबील जातीचे एक कासव मृतावस्थेत आढळले. समुद्रातील शेवाळ खाताना त्याने प्लास्टीक खाल्ले असावे आणि त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज मत्स्यतज्ञांनी व्यक्त केला आहे.
जवळपास दोन ते अडीच फुट लांब आणि दिड ते दोन फुट रुंदीचं हे कासव आहे. त्याचा मृत्यू अंदाजे दोन दिवसांपूर्वी झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सकाळी समुद्र किनारी फिरणाऱ्या नागरिकांना हे कासव मृतावस्थेत आढळले. त्यांनी याची माहिती वन विभागाला दिली. खोल समुद्रात राहणारे हे कासव समुद्रातलं शेवाळ खाते. शेवाळ सोबत प्लास्टिक खाल्ल्याने कासवाचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. भाट्ये किनारी यापूर्वी देखील ऑलिओ रेडली जातीची कासव मृतावस्थेत सापडली आहेत. आता हॉकबील जातीचे कासव मृतावस्थेत सापडल्यामुळे या कासवांचं संरक्षण करण्याची गरज प्राणीप्रेमींनी व्यक्त केली आहे.