कायद्याने दिडशे मीटर परिसरातच बसणार, कष्टकरी हॉकर्स – भाजीविक्रेता युनियनचा ठाम निर्धार
डोंबिवली, (प्रशांत जोशी) : येणाऱ्या दिवाळी हंगामात पालिका प्रशासन आणि फेरीवाले यांच्यातील जोरदार धुमश्चक्री होण्याची शक्यता आहे. एक प्रकारे तसे आव्हानच कष्टकरी हॉकर्स व भाजीविक्रेता युनियनच्या शिष्टमंडळाने दिले आहे. युनियनच्या या इशाऱ्यामुळे डोंबिवलीत पालिका अधिकारी व फेरीवाल्यांमध्ये राडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पालिका प्रशासनाने फेरीवाल्यांच्या जुन्या मागण्या मान्य कराव्या यासाठी डोंबिवली विभागीय कार्यालयावर मोर्चा आणला होता. प्रभागक्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत यांना मागण्यांचे निवेदन दिले. आम्हाला न्याय द्या जर आमच्यावर अन्याय केला तर कायद्यानेच आम्ही दिडशे मीटर परिसरातच बसणार. कष्ट करून आम्ही पोट भरत आहोत आम्ही दरोडेखोर नाही. तुमच्या राजकारणात आम्हाला खेचू नका अशी रोकठोक भूमिका युनियनच्या शिष्टमंडळाने घेतली.
कष्टकरी हॉकर्स व भाजीविक्रेता युनियन तर्फे फेरीवाल्यांचा मोर्चा डोंबिवली विभागीय कार्यालयावर शुक्रवारी दुपारी धडकला. युनियनचे अध्यक्ष बबन कांबळे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. पूर्वेकडील नेहरूरोड पासून सुरू झालेला मोर्चा राथ रोड, रामनगर, केळकर रोड, रामकृष्ण हॉटेल मार्गे पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालय येताच ‘जीना है तो मरना सिखो, कदम कदम पे लढना सिखो’, ‘संघर्ष हमारा नारा है’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. परंतु शिष्टमंडळातील पदाधिकारी राजेंद्र सोनवणे, भाऊ पाटील, संदीप वर्मा, मधू बिरमोळे, आशा मगरे, नूतन रणदिवे यांनी मोर्चेकऱ्यांना शांततेचे आवाहन करून कायद्याने लढण्याचे सांगत मोर्चेकरी फेरीवाल्यांशी संवाद साधला. आपल्या मागण्या पालिका प्रशासनासमोर मांडून न्यायाने लढा नक्कीच जिंकणार असे सांगितले. रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंग पवार यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
मोर्चाच्या शिष्टमंडळाने प्रभागक्षेत्र अधिकारी कुमावत यांना निवेदन दिले. निवेदनात हायकोर्टाच्या आदेशनुसार 2017 अन्वये कल्याण डोंबिवली परिसरातील उध्वस्त झालेल्या पथ विक्रेत्यांची कायद्यानुसार नोंदणी करून पथ विक्रेता प्रमाणपत्र त्वरित देण्यात यावे. उध्वस्त झालेल्या पथ विक्रेत्यांना तात्पुरती जागा विनाविलंब देण्यात यावी. या प्रमुख मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास पथ विक्रेत्यांना आत्महत्तेशिवाय पर्याय राहणार नाही असे नमूद करण्यात आले आहे. परंतु या सर्व बाबी आयुक्त्यांच्या कक्षात असून त्यांना निवेदन देण्यात येईल अशी भूमिका कुमावत यांनी घेतल्याने शिष्टमंडळाने कायद्याने लढण्याचा इशारा दिला. येत्या दिवाळी हंगामात आमची उपासमार होऊ नये म्हणून दिडशे मीटर परिसरातच बसणारच असे स्पष्ट सांगितले.
याबाबत शिवगर्जनाचे भाऊ पाटील म्हणजे कि, आमच्यावर राजकीय दबावाने कारवाई केली. आम्ही दरोडेखोर नाही. पंधरा पुरुष आणि पाच महिला फेरीवाल्यांना सरकारी कामात हस्तक्षेप म्हणून जेलची हवा खावी लागते हा कोणता न्याय ? कष्ट करून पोट भरणे हा गुन्हा आहे का ? ज्यांनी जागा दिल्या त्यानंतरच फेरीवाले तेथे बसले आणि जेलची हवा खावी लागली हा कोणता न्याय ? पालिका अधिकारी न्यायालयाच्या निर्देशानुसार काम करीत नाहीत हा आमचा आरोप आहे.