डोंबिवली, (प्रशांत जोशी) : फेरिवाल्यांच्याविरोधात पालिकेच्या डोंबिवली विभागाने कडक कारवाई सुरु केली आहे. दोन महिन्यांपासून फेरिवाल्यांना स्टेशन परिसरात बसू दिले जात नाही. यामुळे संतापलेल्या फेरिवाल्यांनी गुरुवारी सायंकाळी आक्रमक पवित्रा घेतला. सामान जप्तीसाठी आलेल्या पालिकेच्या गाडीसमोर ठिय्या आंदोलन केले. परंतु पालिकेने जप्त केलेले सामान परत न देता डोंबिवली पालिका विभागीय कार्यालय आणले असता काही फेरिवाल्यानी पालिकेच्या कार्यालयात धाव घेतली. परंतु सुरक्षा रक्षकांनी मुख्य प्रवेशद्वार बंद करुन फेरिवाल्याना मज्जाव केला.
येथील एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी फेरिवाल्यांच्या विरोधातील कारवाईस मज्जाव करत असल्याने बुधवारी त्यांच्यावर रामनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुरुवारीही त्यांनी या फेरीवाल्यांची पाठराखण केली.
दरम्यान, महापौर विनिता राणे यांनी गेल्या आठवड्यात डोंबिवली पूर्व भागात लागोपाठ तीन दिवस दौरा करुन फेरिवाल्यांवरील कारवाईबाबत पालिका अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. महापौरांच्या आदेशाचे पालिका अधिकारी व कर्मचारी करत असल्याचे चित्र आहे.