
ठाणे : राज्यामध्ये मुंबई, नवी मुंबई -ठाणे येथे फक्त सकाळच्या वेळी थंडी दाखल होत असून दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन उकाडा होण्यास सुरुवात होते. सकाळी गारवा व दुपारी उकाडा अशा विचित्र वातावरणामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य बिघडत असल्याची माहिती नवी मुंबईतील आरोग्यक्षेत्रामधून पुढे आली आहे.
दिवाळी संपून एक महिना झाला असला तरीही घामाघूम होत असलेला शहरातील नागरिक गेले आठ दिवस सकाळच्या वेळेस थंड हवेची मजा घेत असले तरी नागरिकांमध्ये सांधेदुखीची तक्रार वाढीस लागल्याचे निरीक्षण वाशी येथील स्टर्लिंग वोक्हार्ट हॉस्पिटलच्या सांधेदुखी क्लिनिकने व्यक्त केले आहे. याविषयी अधिक माहिती देताना वोक्हार्ट हॉस्पिटलचे जेष्ठ अस्थिव्यंगतज्ञ व शल्यविशारद डॉ. शैलेंद्र पाटील म्हणाले, ” गेल्या २० वर्षात झपाट्याने बदललेल्या जीवनशैलीमुळे मुंबई व लगतच्या शहरांमध्ये गुडघेदुखीच्या आजारात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. प्रामुख्याने थंडीच्या काळात आणि ढगाळ हवामानात संधिवात आजार आपले डोके वर काढतो. मानसिक ताण-तणाव, व्यायामाचा अभाव, एसीमध्ये सतत बसून काम करणे , आहाराच्या बदललेल्या सवयी या गोष्टी संधिवात वाढण्यास कारणीभूत आहेत. पूर्वी वयाच्या पन्नाशीनंतर दिसून येणारा हा आजार आता चाळीशीनंतर दिसून येत आहे. हिवाळी ऋतू हा अनेक जुन्या व्याधी आणि दुखण्यांना निमंत्रण देणारा ठरतो. अनेक वयस्कर लोकांना या काळात सांधेदुखीचा त्रास जाणवू लागतो. काही व्यक्तींना चालताना, उठताना आणि बसताना किंवा कोणतेही काम करताना सांध्यांमधून कळा येतात. काहींना एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणे कठीण होऊन बसते. स्नायूंचे दुखणे, हाडांच्या जॉईंटमध्ये दुखणे , गुडघेदुखी, हाडांचा ठिसूळपणा, पाठदुखी, आमवात आदी आजार हे संधिवाताचे विविध आजार वाढण्याचा धोका या वातावरणात होण्याचा अधिक धोका आहे. ”
हवेतील धुके व प्रदूषण यांच्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या व्याधीविषयी माहिती देताना तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरचे मुख्य इंटेन्सिव्हिस्ट (फीजिशियन ) डॉ. भरत जग्यासी सांगतात, ” वातावरणात दाटलेले धुके, व सकाळचा गारवा हे वातावरण खास करून जेष्ठ नागरिक, गर्भवती महिला व लहान मुलांमध्ये आजार बळावण्याचे प्रमुख्य कारण आहे. सकाळी हवेचे कमी झालेले तापमान आणि प्रदूषण यामुळे श्वसनमार्गाची प्रतिकार शक्ती कमी होऊन जंतुसंसर्ग झपाटय़ाने होण्यास मदत होते. फुफ्फुसांना सूज येवून त्या भागामध्ये कफ जमा होतो. स्पंज सारखा नरम असणारा फुफ्फुसाचा बाधित हिस्सा घट्ट बनतो आणि तो श्वसनक्रियेत भाग घेऊ शकत नाही. त्यामुळे रुग्णाला खोकला, ताप येऊ लागतो. याशिवाय थंड हवा आणि हवेच्या खालच्या थरामध्ये स्थिर झालेले प्रदूषण यामुळे डोळ्यांची जळजळ होणे, गुदमरल्यासारखे वाटणे, नाक व घसा जळजळणे, शिंका येणे, खोकला, घसा खवखवणे यामुळे नवी मुंबईतील नागरिक त्रस्त आहेत. ”
संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी रस्त्यावरील सिग्नल व चौक, तसेच वाहतूक कोंडी अशा ठिकाणी कमीत कमी वेळ थांबावे. थांबणे गरजेचे असेल तर तोंडावर आणि नाकावर रुमाल किंवा मास्क लावावा. खोकताना अथवा शिंकताना नाका तोंडावर रुमाल किंवा कपडा धरावा. यामुळे आसपासच्या व्यक्तींना होणारा संसर्ग काही प्रमाणात कमी होऊ शकतो अशी माहिती तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे















