मुंबई : हवाई वाहतूक क्षेत्रामध्ये लक्षणीय विकास होत असल्याने, अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये हवाई वाहतूक क्षेत्र देखील महत्वपूर्ण भूमिका बजावेल, असं नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सांगितले. मुंबईमध्ये आयोजित विमानतळ गुंतवणूक परिषदेत ते आज बोलत होते.
हवाई वाहतूक क्षेत्राचा विकास होत असून, त्याचा वार्षिक विकास दर १२ टक्के आहे. या क्षेत्रामधील क्षमतांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने विमानतळ पायाभूत सुविधा आणि प्रादेशिक संलग्नतेचा विस्तार करण्याचे ठरविले आहे. मागील तीन वर्षात सरकारने अनेक धोरणात्मक उपक्रम राबविल्याने ही तीन वर्ष खूपच महत्वपूर्ण आहेत. यामध्ये हवाई वाहतूक क्षेत्रामध्ये १०० टक्के थेट परदेशी गुंतवणुकीला मंजूरी, हवाई सेवा पोर्टल सारखी ग्राहक केंद्रीत उपाययोजना, सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आणि प्रवाशांना पेपररहित डिजिटल प्रवासाचा अनुभव देण्यासाठी सरकार डिजीयात्रेची योजना तयार करत आहे, असेही सिन्हा म्हणाले.
विमानतळांच्या विस्ताराविषयी सिन्हा म्हणाले, अमेरिका आणि चीनसारख्या अर्थव्यवस्था सोबत तुलना केली, तर भारताला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. देशाला अजून १५० ते २०० विमानतळांची आवश्यकता आहे, ज्याद्वारे ९० टक्के लोकसंख्या एक ते दीड तासात कुठल्याही विमानतळावरुन प्रवास करु शकेल. २०० कोटींच्या गुंतवणुकीसह ३१ नवीन विमानतळांची उभारणी होत आहे. दरवर्षी १ नवीन विमानतळ सुरु होईल.
नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या सहाय्याने आय एम सी ने मुंबईत २ दिवसीय विमानतळ गुंतवणूक परिषदेचे आयोजन केले होते. सध्या कार्यान्वित असलेल्या विमानतळाच्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी तसेच इतर विकास कामांसाठी अंदाजे १३० बिलियन अमेरिकन डॉलरच्या गुंतवणुकीची गरज आहे.