रत्नागिरी : छत्रपती संभाजीनगर येथील ख्यातनाम हस्तसामुद्रिक शास्त्रतज्ञ, ज्योतिर्विद्या वाचस्पती अॅड. प्रफुल्ल कुलकर्णी यांचे किमया हस्तरेषांची या विषयावर रविवार दि. ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता व्याख्यान आयोजित केले आहे. अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ, रत्नागिरी या संस्थेने याचे आयोजन केले आहे. मंडळाच्या जोशी पाळंद येथील भगवान परशुराम सभागृहात व्याख्यान होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांना विनाशुल्क खुला आहे.
ज्योतिषशास्त्र (वैदिक अॅस्ट्रॉलॉजी) ही पुरातन भारतीय वेदकालीन फिलॉसॉफी आहे. जिथे वैज्ञानिक दृष्टिकोनातून विविध ग्रहताऱ्यांचे पृथ्वीच्या दृष्टीने होणारे भ्रमण आणि त्यांचे मानवी जीवनावर होणारे परिणाम याचे सखोळ संशोधन केले जात असे. अॅड. प्रफुल्ल कुलकर्णी हे गुरु कृपांकित ज्योतिषी असून गुरुदेव वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज यांच्या आशिर्वादातून घडलेले हस्तरेखातज्ज्ञ आहेत. त्यांची हस्तरेषवरील दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. नुकतेच त्यांचे तिसरे हस्तरेषा श्रेष्ठ शास्त्र हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. हस्ताक्षर व ठसेतज्ज्ञ असलेले अॅड. कुलकर्णी हे वादामध्ये असलेल्या हस्ताक्षर व सही व अंगठ्याचा छाप याविषयी त्यांचे तज्ज्ञमत ते न्यायालये, बॅंका, संस्था यांना गेली २५ वर्षे देत आहेत. त्यांचे न्यायालयात ग्राह्य धरले जाते.
व्याख्यानाबरोबरच दि. ४ ते ७ डिसेंबर अशी चार दिवसाची हस्तरेषा शास्त्रावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळा सशुल्क असून अधिक माहितीसाठी श्रीनिवास जोशी (9422473080 किंवा 9404332705) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच ज्यांना हस्तरेषांद्वारे भविष्य जाणून घ्यायचे असेल त्यांनीही संपर्क साधावा. वरील व्याख्यान व कार्यशाळेचा लाभ ज्योतिषप्रेमी, ज्योतिषी, ज्योतिष संशोधक या मंडळींनी घ्यावा, असे आवाहन मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, कार्यवाह राजेंद्र पटवर्धन व सर्व पदाधिकारी, कार्यकारी मंडळ सदस्यांनी केले आहे.