
डोंबिवली, (प्रशांत जोशी) : कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रभाग क्रमांक 57 जयहिंद कॉलनी येथील नगरसेविका, विद्यमान स्थायी समिती सदस्या आणि जॅकलीन इंग्लिश स्कूलच्या संचालिका हर्षदा हृदयनाथ भोईर यांचा वाढदिवस जॅकलीन इंग्लिश स्कूल शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, प्रभागाचा विकास आणि राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष संगठन या गोष्टींकडे लक्ष केंद्रित असल्याचे त्यांनी यावेळी विषद केले.
राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे ठाणे जिल्ह्यातील जेष्ठ नेते कै. सुदाम भोईर यांचे सुपुत्र आणि कॉंग्रेसचे जेष्ठ नेते कै. पंडित भोईर यांचे पुतणे हृदयनाथ भोईर यांच्या हर्षदा या पत्नी असून गेल्या अनेक वर्ष भोईर कुटुंब डोंबिवली पश्चिम विभागातील जयहिंद कॉलनी प्रभागाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. भोईर दाम्पत्यांच्या मुलाच्या शाळा प्रवेशावेळी मान्यताप्राप्त एका शाळेच्या संस्था चालकांनी त्यांच्या मुलाला शाळा प्रवेश नाकारला होता. त्या इर्षेने भोईर दाम्पत्यांनी जॅकलीन नावाने नर्सरी सुरु केली. आज त्या छोट्या रोपट्याला फांद्या फुटल्या असून त्या नर्सरीची जॅकलीन इंग्लिश स्कूल शाळा प्रभागात प्रसिद्ध आहे. इंग्रजी मध्यम असलेल्या शाळेत पाचशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे सुमारे पस्तीस शिक्षकवृंद हर्षदा भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यादानाचे महान कार्य करीत आहेत. आणि या कार्यात हृदयनाथ भोईर यांची साथसोबत प्रकर्षाने मिळत आहे. यावर्षी प्रथमच जॅकलीन शाळेचे विद्यार्थी 10वी च्या बोर्डाची परीक्षा देणार आहेत.
प्रभागातील विकास कामांबाबत त्या म्हणाल्या संपूर्ण प्रभागात चाळीस वर्षांपूर्वीच्या नळपाणी योजनेचे नुतनीकरण करून पाणी समस्या निकालात काढली आहे. प्रभाग स्वच्छ सुंदर केला आहे. पण प्रशासनाचा कारभार ढिसाळ असून विकास कामांना गती मिळत नाही. अपुरा निधी विकास कामांना अडथळा ठरत आहे. स्मार्ट सिटी फक्त बोलण्यापुरतच असून विरोधकांना प्रत्येक वेळा डावलले जात आहे. नगरसेविका हर्षदा भोईर यांच्या वाढदिवसाचे औतिच्य साधून विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम केले. शाळेच्या शिक्षकवृंदांनी, विद्यार्थांनी आणि प्रभागातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.














