
रत्नागिरी, (आरकेजी) : ब्रह्मीभूत संत आणि पटवर्धन कुळातील मूळपुरुष हरभटजीबावा पटवर्धन यांचे नित्यस्मरण व्हावे व त्यांची माहिती भाविकांपर्यंत पोहोचवण्याकरिता गोवळकोट-चिपळूण येथील श्री सोमेश्वर-करंजेश्वरी मंदिरात त्यांचे तैलचित्र व माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. त्याचे अनावरण वेदमूर्ती विनायक पोखरणकर यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमास करंजेश्वरी देवस्थानचे अध्यक्ष अॅड. प्रसाद चिपळूणकर, माजी अध्यक्ष अॅड. शांताराम बुरटे, सदस्य कपडेकर, दादा खातू, रत्नागिरीतील दिलीप पटवर्धन उपस्थित होते. त्यांनी या कार्यक्रमानिमित्त पटवर्धन बंधू-भगिनींचे आभार मानले. कार्यक्रमाच्या प्रारंभी वेदमूर्ती पोखरणकर आणि वेदमूर्ती लेले यांनी वेदमंत्रपठण केले.
राधिका पटवर्धन यांनी गणपतीपुळे येथे २२ जुलै २०१४ ला हरभटजींचे तैलचित्र प्रदर्शित केल्याची माहिती दिली. मिरज येथील इरावती पटवर्धन यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर पोखरणकर गुरुजींनी पुराणकाळातील दाखले देऊन आजच्या तैलचित्र अनावरण सोहळ्याचे महत्त्व विषद केले.
या कार्यक्रमास रत्नागिरी, पुणे, मिरज, सांगली, कुरुंदवाड, तासगाव, जमखिंड येथील पटवर्धन बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखिल चित्पावन ब्राह्मण मंडळाचे कार्यवाह राजेंद्र पटवर्धन यांनी सूत्रसंचालन केले.