‘हर हर महादेव’ या चित्रपटाची कथा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या स्वप्नाची आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी स्वतःच्या प्राणाचीही पर्वा न करता धिरोदात्तपणे लढणा-या झुंजार योद्धा बाजीप्रभू देशपांडे यांची. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे साकारत आहे तर हिंदी आणि मराठी चित्रपटांत अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारणारा लोकप्रिय अभिनेता शरद केळकर बाजीप्रभुंच्या करारी भूमिकेत दिसणार आहे.
या भूमिकेबद्दल बोलताना सुबोध भावे म्हणाले की, “आपण जेव्हा एखाद्या खूप प्रसिद्ध अशा देवळामध्ये जातो तेव्हा आतमध्ये जाऊन देवाचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करतो. ते दर्शन प्रत्येकालाच हवं तसं मिळत नाही कारण ही भक्ताची नाही तर परमेश्वराची इच्छा असते आणि त्या इच्छेनुसारच तो प्रत्येकाला दर्शन देतो असं मला वाटतं. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या भूमिकेबाबतही मला असंच वाटतं. माझी इच्छा होती म्हणून मला ती भूमिका मिळाली असं नसून मी ती भूमिका करावी ही कुठेतरी महाराजांची इच्छा असेल आणि त्या इच्छेतूनच ती मला मिळाली असं मी मानतो. महाराजांच्या या इच्छेला आणि या भूमिकेलाही पूर्णपणे न्याय देण्याचा मी प्रयत्न केलाय तो प्रेक्षकांना आवडेल अशी आशा आहे.
तर चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारणारे शरद केळकर म्हणाले की, “यापूर्वी एका लोकप्रिय हिंदी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारल्यानंतर लोकांमध्ये महाराजांविषयी असलेल्या आदर आणि प्रेमाची जाणिव झाली होती. खरं तर अभिजीत देशपांडे ‘हर हर महादेव’ चित्रपटाची गोष्ट घेऊन जेव्हा माझ्याकडे आले होते तेव्हा मला वाटलं होतं ते महाराजांच्या भूमिकेबद्दल विचारणा करतील परंतू त्यांनी बाजीप्रभूंच्या भूमिकेसाठी विचारून मला आश्चर्याचा धक्का दिला. या भूमिकेबद्दलचं त्यांचं व्हिजन आणि मी ही भूमिका करु शकेल याबद्दलची त्यांना असलेली खात्री हे बघूनच मी या भूमिकेसाठी होकार दिला. जे प्रेम मला शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळं मिळालं त्याहूनही अधिक बाजीप्रभुंच्या भूमिकेमुळे अशी मला आशा आहे. आजवर मराठीत अनेक भूमिका केल्यानंतरही हवी तशी ओळख निर्माण करता आली नाही याची मला नेहमीच खंत होती. परंतू आता बाजीप्रभूंची ही भूमिका ‘मराठी अभिनेता’ म्हणून मला एक नवी ओळख मिळवून देईल याची मला पूर्णपणे खात्री आहे.”
तर चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक अभिजीत देशपांडे आपल्या मनोगतात म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर एक भव्य दिव्य चित्रपट करण्याचं स्वप्न गेल्या अनेक वर्षांपासून मी उराशी बाळगून होतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं तोरण बांधलं. हे तोरण बांधण्यासाठी आपल्या तळहातावर प्राण घेऊन मावळे कसे लढले याची गोष्ट मला सांगायची होती. शिवाय स्वराज्याच्या तोरणासोबतच त्यामागचं महाराजांचं नेमकं धोरण काय होतं हे तेवढ्याच भव्य दिव्य स्वरुपात सांगायचं होतं त्यासाठीच या चित्रपटाचा घाट घातला.”
‘हर हर महादेव’ या चित्रपटात सुबोध भावे आणि शरद केळकर यांच्यासह अभिनेत्री अमृता खानविलकरही एका विशेष भूमिकेत दिसणार आहे. सुनील फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग एन्ड फिल्म्स तसेच झी स्टुडियोजची निर्मिती असलेला हा चित्रपट २५ ऑक्टोबरला भारतभरात प्रदर्शित होणार आहे.