रत्नागिरी (आरकेजी): रत्नागिरीतून थेट युरोपमध्ये हापूस पाठविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एनपीपीओकडून उष्णजल प्रक्रियेला हिरवा कंदिल मिळाल्याचे सर्टिफिकेट रत्नागिरीतल्या प्रकिया केंद्राला प्राप्त झाले आहे. त्यामुळे साडेचारशे डझन आंबा उष्णजल प्रक्रियेद्वारे युरोपवारीसाठी हवाईमार्गे आज रवाना झाला आहे.
रत्नागिरीत उष्णजल प्रक्रिया यंत्रणा असूनही 2015 पासून आंबा थेट युरोपला पाठविण्यात तांत्रिक अडथळे निर्माण झाले होते. पीक संरक्षण संघटना (एनपीपीओ), अपेडा यांच्या पथकाने रत्नागिरीतील आंबा प्रक्रिया केंद्राची तपासणी केली होती. मात्र काही कारणास्तव सर्टिफिकेट पाठविण्यात उशीर झाला होता. त्यामुळे रत्नागिरीतील पणन अधिकार्यांनी बागायतदारांची गैरसोय होऊ नये, यासाठी थेट एनपीपीओच्या अधिकार्यांकडे पाठपुरावा करुन सर्टिफिकेट तत्काळ मिळविण्यासाठी धडपड केली. त्याला यश आले असून हे सर्टिफिकेट प्राप्त झाल्यानंतर लगेचच पहिली कन्साईनमेंट रत्नागिरीतून रवानाही झाली आहे. मँगोनेटवरील नोंदणीकृत रत्नागिरीतील बागायतदार समीर दामले यांच्या बागेतील साडेचारशे डझन आंबा युरोपवारीला रवाना झाले असल्याची माहिती, पणन मंडळाचे उप सरव्यावस्थापक डॉ भास्कर पाटील यांनी दिली. गुरुवारी रत्नागिरीतील प्रक्रिया केंद्रात उष्णजल प्रक्रिया झाली. युरोपच्या निकषानूसार 48 अंश सेल्सिअसला 60 मिनीटांची प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर आंबा मुंबईत गेला आणि आज आंबा युरोपला रवाना झाल्याचे ते म्हणाले.