कणकवली : हलक्या दर्जाच्या बारदानाच्या पोत्यांमुळे कणकवली येथील शासकीय गोदामात आलेले तांदूळ खराब होत आहेत, याबाबत जनता दल सेक्युलरने आवाज उठवला आहे. पक्षाचे प्रदेश सचिव संजय परब आणि मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. सोबत कुडाळहून कणकवली येथील शासकीय गोदामात आलेल्या तांदळाच्या पोत्यांची छायाचित्रेही पुरावा म्हणून जोडण्यात आली आहेत.
पोती हलक्या दर्जाची असल्याने थोड्याशा हलवाहलवीनेही ती फाटत आहेत. त्यामुळे रेशनिंगवर पुरवायच्या तांदळाची ही अशी अवस्था झाली आहे. धान्याची पोती हमाल लोखंडी हुकाचा वापर करून उचलतात वा त्यांची हलवाहलव करतात. परंतु पोती एवढी खराब आहेत; की दोन हमालांनी दोन्ही बाजूंनी धरून उचलण्याचा प्रयत्न केला तरी आतील तांदळाच्या वजनाने ती फाटतात. त्यामुळे तांदूळ विखुरला गेला आहे, याकडे जनता दलाने लक्ष वेधले आहे.
जमिनीवर पसरलेला हाच तांदूळ सुपाने गोळा करून तालुक्यातील रेशन दुकानांवर गरिबांना स्वस्तातील वा मोफत धान्य म्हणून पाठविण्यात येईल. सरकार दरबारी गरिबांविषयी किती अनास्था आहे याचेच हे द्योतक आहे.
याबाबत योग्य ती चौकशी करण्याचे आदेश संबंधितांना देऊन दोषी व्यक्तींवर कारवाई करावी, अशी विनंती जनता दल सेक्युलर पक्षाच्या वतीने आम्ही करीत आहोत, असे परब आणि नारकर यांनी सांगितले.