मुंबई : उत्तर प्रदेशसह उत्तराखंडच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा विजय हा स्मशानाचा विजय आहे, अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. “उत्तर प्रदेशात कब्रस्तान जास्त आहेत. तुम्हाला स्मशान हवे की कब्रस्तान हवे?’’ असा प्रश्न पंतप्रधानांनी जाहीर प्रचार सभांमधून विचारला होता, या विधानाला धरूनच शिवसेनेने भाजपाला धारेवर धरले आहे. कारण गाव तेथे स्मशान हे धोरणराबवले तर काय होईल? ही भीती आम्हाला वाटते. स्मशानांपेक्षा कर्जमाफीची आणि रोजगार, कायदाव्यवस्थेची तेथे गरज आहे, असेही अग्रलेखात म्हणण्यात आले आहे.
पंतप्रधानांनी हिंदू आणि मुसलमान अशी सरळ फाळणी केल्याचा आरोपच शिवसेनेने केला आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेने कब्रस्तान विरुद्ध स्मशान या वादात स्मशानाच्या बाजूने मतदान केले आहे. पंतप्रधान मोदी हे उत्तर हिंदुस्थानात मतांचे ध्रुवीकरण करण्यात यशस्वी झाले. मोदींना विजयासाठी हिंदुत्वाचे ‘कार्ड’ खेळावेच लागले, असे म्हणत हिंदुत्वाशिवाय भाजपाचा विजय होणे सोपे नव्हते, याकडे सेनेने लक्ष वेधले आहे.
राममंदिराऐवजी त्यांनी हिंदूंसाठी स्मशाने प्रचारात आणली हे लक्षात घेतले पाहिजे. या प्रचंड विजयानंतर तरी रामाचा वनवास संपून अयोध्येत राममंदिर उभे राहील काय, हा प्रश्न आहे, असेही भाजपाला विचारण्यात आले आहे. शेतकर्यां ना स्मशानात जाण्यापासून त्यांनी रोखले पाहिजे. उत्तर प्रदेशातील विजय हा ‘नोटाबंदी’च्या निर्णयाचा विजय नसून कर्जमाफीच्या गाजराचा विजय आहे, स्मशानाचा विजय आहे, असेही सांगण्यात आले आहे.
मोठय़ा राज्यांतील जय–पराजयाचा डंका नेहमीच जोरात वाजवला जातो. गोव्यात पर्रीकरांसारखा नेता तेथे ठाण मांडून बसला असला तरी भाजपास पूर्ण बहुमत मिळाले नाही व शेवटी बहुमतासाठी तुकडे गोळा करण्याची वेळ आली, अशी खिल्ली अग्रलेखातून उडविण्यात आली आहे. तसेच प. बंगाल, बिहार विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचा पराभव झाला, अशी आठवण करून देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव-राहुल गांधी यांचे पोरकट नेतृत्व मोदी यांच्या लाटेसमोर टिकले नाही असे म्हणत नरेंद्र मोदी यांचे अभिनंदनही शिवसेनेने केले आहे.