डोंबिवली : वैचारिक पातळी पक्की होण्याच्या अगोदर गुरूकडे गेल्यामुळे शिष्याची घडण चांगली होते. शिष्याने गुरूंनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचं आचरण केलं पाहिजे. गुरूंबद्दल जर कोणतीची शंका मनात उत्पन्न झाली तर गुरू आणि शिष्यामधील नाते संपून जाते. शिष्याला गुरूप्रेम तेव्हाच मिळते ज्यावेळी ते दाखविण्याची खरंच गरज असते असे प्रतिपादन शास्त्रीय गानसम्राज्ञी किशोरी आमोणकर यांच्या शिष्या विदुषी नंदिनी बेडेकर यांनी डोंबिवलीत केले.
गोविंदानंद सरस्वती न्यास डोंबिवली माध्यमातून गुरुदेव दत्त वर्ग अंतर्गत गुरूपौर्णिमेच्या विशेष समर्पण कार्यक्रमात गुरू-शिष्य परंपरेबाबतचे अनुभव या कार्यक्रमात बेडेकर बोलत होत्या. नंदिनी बेडेकर यांना अनन्या गोवित्रीकर यांनी विविध प्रश्नरूपाने बोलते केले. यावेळी न्यासाच्या विश्वस्त रेखा उटदिकर, नंदिनी यांच्या शिष्या स्वप्ना नायर, अभिलाष देव, अनन्या गोवित्रीकर, श्रुती हेरवाडकर आदी उपस्थित होते.
संगीत साधना या विषयावर नंदिनी म्हणाल्या, प्रत्येक गोष्ट साधने शिवाय होत नसते. गाणे कठीण साधनेतून अंगी उतरते. गुरूने शिकविलेल्या एक-एक शब्दच्या अंतरातील अचूक मोजमापाचे ते गुपित असते. गुरूच्या सहवासात जेव्हा चोवीस तास येता तेव्हाच तुम्हाला शिष्यपणाची घडण घट्ट झाल्याचे समजून येते.
गुरू-शिष्य यांच्यामधील अनुभव कथन करतांना त्यांनी सांगितले कि, गानसरस्वती गुरुवर्य किशोरीताई यांचाकडे शिकण्यासाठी गेले तेव्हा मी शून्य होते. पूर्वी कधीही गायनाचे कार्यक्रम ऐकलेही नव्हते. त्यावेळी रेडीओवर शास्त्रीय गायन ऐकायला मिळत होते. त्यामुळे आवड उत्पन्न झाली आणि त्यातूनच गांण म्हणण्याची प्रवृत्ती वाढली. पुढे गुरुवर्य किशोरीताई यांच्या सारखा महान गुरू लाभला हे मी भाग्य समजते.
पण आताच्या पिढीतील लोकांना गाण माहित असत, त्यांनी गाण्याचे कार्यक्रम पाहिलेले-ऐकलेले असतात. याला कारण म्हणजे अद्यावत तंत्रज्ञान प्रभावी झाल्यामुळे ते सहज शक्य होत असत. पण पूर्वी तसं नव्हत, गुरूकडे जातांना पाटी पूर्ण कोरी असली तर गुरुजनांना त्यावर भरपूर काही लिहिता येते. मुख्य म्हणजे गुरूप्रमाणेच शिष्याच्या गळ्यातून गाणं आलं पाहिजे. त्यासाठी शिष्याने स्वतःच्या बुद्धीचा वापर न करता गाणं गुरूंनी शिकविल्याप्रमाणे गळ्यातून उमटलं पाहिजे आणि यासाठी श्रद्धा, प्रयत्न केले पाहिजेत.
गुरुवर्य किशोरीताई यांचा स्वभाव कडक होता तरीही त्या मायाळू होत्या. त्यांना चित्रपट पाहण्याची हौस होती. शिक्षण कधीही संपत नाही आजही ते सुरू आहे. गुरू परब्रह्म मानून ते जे सांगतील ते करणे म्हणजे शिष्य होय आणि भगवत गीताही हेच सांगते.
यावेळी नंदिनी बेडेकर यांनी शास्त्रीय गायकीची अदा पेश करून ‘गुरू हा संत कुळीचा राजा, गुरू हा प्राण विसावा माझा’ या अभंगाची गायकी पेश करताच उपस्थित श्रोत्यांनी टाळ्या वाजवून त्यांच्या गायकीला दाद दिली. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंजिरी पाटणकर, स्नेहा टाकसाळे, गीता सिंग यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.