मुंबई : महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केलेल्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रीडा विभागाला दिले. याबरोबरच कुस्तीपटू राहुल आवारे यांनाही थेट नियुक्ती देण्यात यावी, असेही मुख्यमंत्री यांनी यावेळी स्पष्ट केले. मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सर्वसाधारण खेळाडूंच्या प्राप्त ९८ अर्जांपैकी २३ आणि दिव्यांगांमधून प्राप्त २६ अर्जापैकी १० अशा ३३ खेळाडूंना शासन सेवेत सामावून घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत गुणवत्ता पूर्ण खेळाडूंना थेट शासकीय सेवेत सामावून घेण्यासंदर्भातील बैठक काल मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेसी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, क्रीडा संचालक सुनील केंद्रेकर यांच्यासह क्रीडा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले, शासन सेवेत आलेल्या या ३३ खेळाडूंनी आपापल्या खेळात अधिकाधिक खेळाडू तयार करण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करावे आणि उज्ज्वल यश संपादन करावे. या ३३ खेळाडूंना क्रीडा विभागात गट अ ते गट ड प्रवर्गात सामावून घेण्यात येणार आहे.