हिंदीत विशेष नाव आणि प्रसिद्धी मिळाल्यानंतर मराठीत पदार्पण करणाऱ्या हिंदी कलाकरांच्या यादीत गुलशन देवय्या या अभिनेत्याचे नाव येत आहे. राम लीला, शैतान, तसेच हंटर या चित्रपटातून त्याने अभिनयाची छाप पाडली आहे. हा अभिनेता लवकरच ‘डाव’ या मराठी चित्रपटातून झळकणार आहे.
मूळचा बंगळुरूचा असणाऱ्या गुलशनने या सिनेमासाठी महिनाभर मराठीचे धडे गिरवून घेतले आहेत. गुलशन म्हणाला की, “यापूर्वी हंटर या सिनेमात मराठी भाषेत काही एक-दोन वाक्य बोललो असेल, पण त्यामुळे मला मराठी बोलता येते, असे नव्हते. मात्र, आगामी ‘डाव’ या मराठी सिनेमासाठी मला अस्खलित मराठी बोलणे गरजेचे होते, या सिनेमाची कथा मला खूप आवडली होती, त्यामुळे भाषेच्या समस्येमुळे चित्रपट नाकारण्याचा धोका मी पत्करला नाही, त्यापेक्षा महिनाभर मराठीचे प्रशिक्षण घेणे मला योग्य वाटले. अर्थात मुंबईतील मराठी वातावरणात मी राहिलो असल्यामुळे, हि भाषा अवगत होण्यास जास्त वेळ लागला नाही. आता मी चांगल्याप्रकारे मराठी बोलू शकतो.”
ऑडबॉल मोशन पिक्चर्सचा’डाव’ हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. कनिश्क वर्मा यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. शिवाय हिंदी आणि मराठी अशा द्विभाषेमध्ये हा सिनेमा चित्रित झाला आहे. टॉनी डिसुजा, नितीन उपाध्याय आणि अमूल मोहन या सिनेमाचे निर्माते आहेत.