गुजरात : सा-या देशाचे लक्ष वेधलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काटे की टक्कर पाहायला मिळाली. काँग्रेसने २२ वर्ष सत्ता कायम राखणाऱ्या भाजपला केवळ ९९ जागांवर समाधान मानण्यास भाग पाडले. निवडणुकीचा सोमवारी निकाल जाहीर झाला. यात काँग्रेसने ८० जागा जिंकत भाजपची दीड शतकी जागांचे मनसुबे उधळून लावले. मोदींना ही आपल्या बालेकिल्लात सातत्य कायम राखण्यास अपयश आले. काँग्रेसने भाजपच्या १६ जागा कमी करत हादरा दिला. यामुळे राहूल गांधी यांच्या नावाचीच चर्चा दिवसभर सुरू होती. दरम्यान, साडेपाच लाख लोकांनी नोटा हा पर्याय वापरला.
गुजरात विधानसभेच्या १८२ जागांपैकी भाजपने ९९ तर काँग्रेसने ७७ जागा जिंकल्या इतरांना ६ जागा मिळाल्या आहेत. भाजपला ४९.१% तर काँग्रेसला ४१.५% मते मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने त्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचीही कसोटी होती. राहुल गांधी यांच्या सभेला मिळालेला लोकांचा प्रतिसाद आणि पाटीदार समाजाचे नेते हार्दीक पटेल, ओबीसी नेता अल्पेश ठाकोर आणि दलित नेता जिग्नेश मेवानी यांनी एकत्रीतपणे मोट बांधीत मोदीपुढं आव्हान उभ केलं होते. त्यामुळे ही निवडणूक मोदींसाठी प्रतिष्ठेची बनली होती. यआकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र भाजपने ९९ जागांवर विजय मिळवून सत्ता कायम ठेवली असली तरी काँग्रेसच्या वाढलेल्या जागांमुळे राहुल गांधी यांचीच जोरदार चर्चा आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जिंकले
राजकोट पश्चिम या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार व मुख्यमंत्री विजय रुपाणी हे २५ हजाराच्या मताधिक्याने विजयी मिळविला. तसेच मेहसाणा मतदार संघातून उपमुख्यमंत्री नितीन पटेल हे ३६८०७ मतांनी विजयी झाले. तर भाजपचे प्रदेश अध्यक्ष जीतूभाई वाघाणी हे भावनगर पश्चिमेतून ५८३२४ मतांनी विजयी झालेत.
भाजपच्या जागा घटल्या, काँग्रेसच्या वाढल्या
भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी तर भाजपला १५० जागा मिळतील असा दावा केला होता. पण भाजपला १०० चा आकडा ही पार करत आलेला नाही. भाजपला मागील निवडणुकीत ११५ जागा मिळाल्या होत्या, पण यावेळी भाजपच्या तब्बल १६ जागा घटल्या आहेत. मागील २०१२ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या वाट्याला ६१ जागा आल्या होत्या. यावेळी काँग्रेसच्या १६ जागा वाढल्या आहेत.
तरूण नेते जिग्नेश मेवाणी, अल्पेश ठाकोर विजयी
गुजरातमध्ये दलित आंदोलनाचा चेहरा असलेले जिग्नेश मेवानी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून वडगाममधून निवडणूक लढवली. यात त्यांनी २० हजाराहून अधिक मताधिक्याने विजय मिळवला. तर राधनपूरमतदार संघातून ओबीसी नेता अल्पेश ठाकोर हे सुध्दा विजयी झाले.
मोदींच्या किल्ल्यात काँग्रेसचा उमेदवार विजयी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडनगर मतदार संघात काँग्रेसने विजय मिळवला. उंझा मतदार संघात काँग्रेसच्या आशा पटेल या विजयी झाल्या. तर भाजप उमेदवार नारायणभाई पटेल हे पराभूत झाल्याने मोदीना जोरदार धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
भाजपचा विजय असामान्य : नरेंद्र मोदी
गुजरातचा विजय सामान्य नाही तर असामान्य आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निकालाचं विश्लेषण केल. यावेळी त्यांनी ‘गुजरात आणि हिमाचलच्या जनतेचे आभार मानले. तसेच विकासाचा मार्ग निवडला, यातूनच सामान्यांच्या समस्यांचं निराकरण होईल. जीएसटीमुळे भाजपचा पराभव होईल अशा अफवा होत्या, महाराष्ट्रात भाजपने जीएसटीनंतरच मोठं यश मिळवलं. उत्तर प्रदेश निवडणूक सुरु होती तेव्हा जीएसटीमुळे पराभव होईल असा दावा करण्यात आला होता, गुजरातमध्येही हीच अफवा पसरवली गेली’, अशी टीका मोदींनी केली.
पराभवाचा स्वीकार : राहुल गांधी
काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा स्वीकार केला. राहुल यांनी दोन्ही राज्यांमधील नव्या सरकारांना शुभेच्छा देत मतदारांचेही आभार मानले आहेत. ‘द्वेषाच्या विरोधात आपण विवेकाची लढाई लढलो, असेही ते म्हटले.
भाजपच्या विजयात इव्हीएमचा हात : हार्दीक पटेल
गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा विजय झाला आहे. दक्षिण गुजरात व सौराष्ट्रामध्ये भाजपाने इव्हीएममध्ये घोळ केला. इव्हीएममध्ये झालेल्या गडबडीमुळेच भाजप विजय झाला असून भाजपच्या विजयात ईव्हीएमचा हात असल्याचा आरोप पाटीदार समाजाचे नेते हार्दीक पटेल यांनी केला.
हिमाचल प्रदेशमध्ये कमळ फुललं
हिमाचलमध्ये ६८ जागांचे निकाल जाहीर झाले त्यात भाजपने ४४, काँग्रेस २१ तर अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला असला तरी हिमाचल प्रदेशात भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार प्रेमकुमार धूमल यांनाही पराभवराचा धक्का बसला आहे. धुमल हिमाचलच्या सुजानपूर मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांच्याविरोधात काँग्रेसनं राजींदर राणांना तिकीट दिले होते. त्यामुळे हा पराभव भाजपला धक्का देणारा ठरला आहे.