रत्नागिरी, (आरकेजी) : गुहागरच्या किनाऱ्यावरून समुद्रात पोहण्य़ासाठी उतरलेला बारा वर्षांचा मुलगा बुडाल्याची घटना रविवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. पुष्कराज राजाराम पाटील असे त्याचे नाव आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बहे येथील तो रहिवासी आहे. शोधकार्य सुरू असून अद्यापपर्यंत त्याचा शोध लागलेला नाही.
पुष्कराजसह त्याच्या दोन बहिणी, आई-वडील आणि दुसरे एक कुटुंब असे सातजण येथे फिरण्यासाठी आले होते. पुष्कराज हा वडील आणि बहिणींसह पोहण्यासाठी समुद्रात उतरला. अचानक तो बुडू लागला. त्याचा हात धरून त्याला वाचवण्याचा प्रयत्न वडिलांनी केला. मात्र पुष्कराजचा हात त्यांच्या हातातून निसटला आणि तो बुडाला.