रत्नागिरी (आरकेजी): गुहागर तालुक्यातील अनंत चतुर्थीच्या दिवशी दोन गटात झालेल्या मारहाणीत दोन दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला होता. त्यांच्यावर झोंबडी येथील स्मशानात गुरुवारी शोकाकूळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, तावडे गटातील १० जणांना २९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, मंगळवार (ता. २५) पासून झोंबडी गावात गुहागर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून, या प्रकरणातला मुख्य आरोपी समीर तावडे व त्याच्या सहकाऱ्यांच्या घराला वेढा घातला असून, राखीव पोलीस दलाच्या २० जवानांना त्यासाठी तैनात करण्यात आले आहे. सुरेंद्र गंगाराम सकपाळ (३४) व महेंद्र गंगाराम सकपाळ (४२) हे दोन सख्खे भाऊ या हाणामारीत मयत झाले असून, त्यांच्या तिसऱ्या भावाला विरोधी गटाने केलेल्या फि र्यादीत पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी अटक केलेल्या दोन्ही गटांच्या १५ जणांना न्यायालयासमोर उभे केले असता, मारहाण करणाऱ्या तावडे गटातील १० जणांना ३०७ कलमानुसार ठार मारण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली २९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणातील दोघेजण मयत झाल्याचा अहवाल न्यायालयापर्यंत पोहोचला नव्हता. त्यानंतर मंगळावारी रात्री यातील दोघेजण मयत झाल्याचा अहवाल पोलिसांनी न्यायालयात कळविला असून, ३०२ या कलमाखाली या सर्वांवर कारवाई होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. तावडे गटाने केलेल्या परस्पर तक्रारीतील दोघेजण मयत झाले आहेत, तर चौघेजण हॉस्पीटलमध्ये उपचार घेत आहेत. तावडे गटातील त्रिशूल सकपाळ, समीर तावडे, मिलिंद तावडे, अभिजित सकपाळ, मोहन सकपाळ, अजय सकपाळ, वनिता सकपाळ, निखिल सकपाळ, अभिमन्यू सकपाळ, चेतन पाडेकर, महेश वीर अशा ११ जणांवर ३०२ या कलमाखाली गुन्हा नोंद झाला आहे.