रत्नागिरी (आरकेजी): गुहागर नगर पंचायत निवडणुकीमध्ये शहर विकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का देत बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेस मधून बंड केलेले राजेश बेंडल यांनी केलेल्या शहर विकास आघाडीला इथल्या मतदारांनी पसंती देत सर्वाधिक ९ जागांवर विजय मिळवून देत एकहाती सत्ता दिली. अखेर शहरविकास आघाडीने भास्कर जाधव यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावले. त्यामुळे भविष्यात जाधव यांना धोका निर्माण झाल्याची चर्चा आहे.
गुहागर नगरपंचायतीतील १७ जागांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणूकीचे निकाल आज जाहीर झाले. यात शहरविकास आघाडीचे राजेश बेंडल हे २४४६ मतांनी नगराध्यपदी निवडून आले. गुहागर मतदार संघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. इथे राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. आमदार भास्कर जाधव जे देखील राष्ट्रवादीचे आहेत. गुहागर नगर पंचायतीवर राष्ट्रवादीचीच सत्ता होती. गुहागरमध्ये असणारी भास्कर जाधव यांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी शहरविकास आघाडी स्थापन करण्यात आली. त्यामुळे भास्कर जाधव विरुद्ध शहरविकास आघाडी अशी निवडणूकीत रंगत पहायला मिळाली. शहर विकास आघाडीला ९ जागांवर तर भाजपने ६ जागांवर विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्यासाठी हा मोठा धक्का बसला. एकहाती सत्ता असलेल्या राष्ट्रवादीला यावेळी केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.