रत्नागिरी (प्रतिनिधी): रत्नागिरीत घरोघरी गुढी उभारून नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी शोभायात्रा, स्वागतयात्रा काढण्यात आल्या.
साडेतीन मुहूर्तापैकी गुढीपाडवा हे एक. या दिवसांपासून हिंदू नववर्षाचे स्वागत केले जाते. रत्नागिरी जिल्ह्यातील मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात आला. दरम्यान, रत्नागिरीचं ग्रामदैवत श्री देव भैरी देवस्थान आणि पतितपावन मंदिर संस्थेच्या वतीने दरवर्षी गुढीपाडवा शोभायात्रा जल्लोषात काढण्यात येते. या शोभायात्रेचं वैशिटय म्हणजे या शोभायात्रेमध्ये रत्नागिरी शहराची ग्रामदेवता असलेल्या भैरी देवतेच्या पालखीची प्रतिकृती देखील यामध्ये सहभागी होते. ग्रामदेवता मंदिर ते समाजमंदिर या संकल्पनेनुसार भैरी मंदिर ते पतितपावन मंदिरपर्यंत शोभायात्रा काढण्यात येते. ग्रामदैवत भैरीबुवाच्या प्रांगणात गुढी उभी करून, गाऱ्हाणे घालून शोभायात्रेला सुरवात होते. भैरी मंदिर ते पतितपावन मंदिरपर्यंत हि शोभायात्रा काढण्यात येते. अनेक चित्ररथ या शोभायत्रेत सहभागी झाले होते. एक वेगळा सामाजिक संदेश या चित्ररथांच्या माध्यमातून देण्यात आला. लहानांसह वृद्धांपर्यत सर्वजजण या शोभायात्रेत मोठ्या प्रमाणात उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते. दरम्यान मारुती मंदिरपासूनही एक शोभयात्रा निघाली, या शोभायात्रेतही चित्ररथांंच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक संदेश देण्यात आले..पाणी किती महत्वाचं आहे हा एक महत्वाचा संदेश या शोभायात्रेच्या माध्यमातून देण्यात आला.. दरम्यान नरेंद्र महाराज संस्थानच्या वतीनेही काढण्यात आलेल्या शोभायात्रेत माजी खासदार निलेश राणे यांनीही हजेरी लावली.