मुंबई : कोरोना विरोधात लढणार्या स्वयंसेवकांना विमा संरक्षण द्या, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ऍड. रितेश करकेरा यांनी केली आहे.
सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते जीव धोक्यात घालून गरजूंना मदत पोहचवत आहेत. या काळात त्यांना काही झाल्यास कुटूंबाचे काय ? हा प्रश्न आहे, अशा लढाऊ स्वयंसेवकांना गट विमा अंतर्गत संरक्षण देण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केल्याचे ऍड. करकेरा यांनी सांगितले.
केंद्र सरकारने पुन्हा दोन आठवडयांसाठी लॉकडाउन वाढविला. १७ मे पर्यंत लॉकडाउन कायम राहणार आहे. यामुळे या दिवसांत मदतीसाठी स्वयंसेवकांना अधिक कार्य करावे लागेल. या सेवकांना विमा संरक्षण द्यायलाच हवे, असे करकेरा यांचे म्हणणे आहे.
डॉक्टर आणि परिचारिका यांना रुग्णांची सेवा करताना कोरोनाची लागण झाली. सरकारचे त्यांच्यासाठी विमा कवच उपलब्ध आहे. सामाजिक संस्थांचेही स्वयंसेवक या काळात काम करत आहेत. त्यांना कोणते संरक्षण कवच नाही. संकट काळात काम करणाऱ्या सरकारी आणि सामाजिक संस्थेच्या स्वयंसेवकांना विमा संरक्षण मिळावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तसेच पालिका आणि पोलीस प्रशासनाने स्वयंसेवकांना काम करण्यासाठी पासेस दिले आहेत. यामुळे अशा लोकांचे वर्गीकरण करणे ही कठीण नाही, असे करकेरा यांनी सांगितले.