रत्नागिरी, (आरकेजी) : आशिया खंडातील सर्वात मोठा ग्रीन रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातल्या नाणार परिसरात प्रस्तावित आहे. मात्र या प्रकल्पाचा विरोध आता तीव्र होत आहे. त्यातच आता या प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी 28 डिसेंबर रोजी तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. प्रकल्पविरोधी शेतकरी व मच्छिमार यांच्यावतीने या तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. तालुक्यातील विविध संघटनांनी देखील या बंदला पाठींबा दर्शविला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील नाणार इथं आॅईल रिफायनरीचा प्रकल्प प्रस्तावीत आहे. या प्रकल्पासाठी जमिन अधिग्रहणाची प्रकिया सुरु शासनाकडून सुरु झाली आहे. मात्र स्थानिकांचा याला विरोध आहे. अनेक ठिकाणची मोजणी ग्रामस्थांनी करू दिली नव्हती. या प्रकल्पाविरोधात मुंबईत तसेच नागपूरला देखील आंदोलनं झाली. या प्रकल्पाला हद्दपार करण्यासाठी इथले प्रकल्पग्रस्त सरसावले आहेत. हा प्रकल्प रद्द करावा या मागणीसाठी येत्या गुरुवारी राजापूर बंदची हाक देण्यात आली आहे. प्रकल्प विरोधी शेतकरी, मच्छिमार संघटना आणि शिवसेनेनी ही बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये सर्व राजकीय पक्ष, व्यापारी संघटना, रिक्षा चालक-मालक संघटना, विविध सामाजिक संस्था, गुरव समाज संघटना, राजापूर तालुका कुणबी संघटना, चिरेखान संघटना यांच्यासह अन्य काही संघटनानी या राजापूर बंदमध्ये सहभागी व्हावे व हा बंद यशस्वी करावा असे आवाहन संघटनेच्यावतीने करण्यात आलं आहे. दरम्यान या बंदमध्ये राजापूर तालुक्यातील सर्व बाजारपेठा या गुरुवारी बंद राहणार आहेत. त्यामुळे विविध आंदोलन आणि त्यानंतर बंदची हाक देवून आता पुन्हा एकदा प्रकल्पाविरोधातले वातावरण तापू लागलं आहे.