
मुंबई : महाराष्ट्र शासनाने 20 एप्रिल पासून नगरपालिका आणि महानगरपालिका हद्दीबाहेरील व ऑरेंज व ग्रीन क्षेत्रातील उद्योग-व्यवसाय सुरू करण्याबाबत निर्णय घेतला आहे. हा निर्णय योग्य नसून करोना विषाणूंचा प्रादुर्भाव व फैलाव वाढण्यास कारणीभूत ठरेल अशी भीती सिटू या कामगार संघटनेने व्यक्त केली आहे. ३ मे पर्यंत लॉक डाऊन पूर्वीप्रमाणेच कडकपणे अमलात आणणे आवश्यक आहे. सध्या सुरू असलेले अत्यंत आवश्यक उद्योगच सुरू ठेवावेत व इतर उद्योग व आर्थिक व्यवहार सुरू करू नयेत, अशी मागणी सिटू ने केली आहे.
सिटूने राज्यसरकारकडे मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :
- ज्या प्रकारे व ज्या पद्धतीचे उद्योग सुरू करण्याचे प्रस्तावित केले आहे, त्याची संख्या पाहता राज्यातील 50 टक्क्यापेक्षा जास्त उद्योग व व्यवसाय सुरू होतील. त्यामुळे प्रवास, गर्दीचे प्रमाण वाढुन शारीरिक अंतर राखण्याचे निर्णयाचे उल्लंघन होईल.
- उद्योग सुरू करताना अनेक अटी शर्ती आपण घातलेले असल्या तरीसुद्धा त्याची सर्वत्र तंतोतंत अंमलबजावणी होण्याची शक्यता नाही, हा आपला नेहमीचा अनुभव आहे . 70 टक्के उद्योजक किंवा व्यावसायिक कामाच्या ठिकाणी किंवा जवळ कामगारांची निवासाची , वाहतुकीची व्यवस्था व आरोग्यविषयक व्यवस्था करू शकत नाहीत असे एका सर्वे मध्ये स्पष्ट झाले आहे.
- मुंबई, ठाणे ,पुणे ,नवी मुंबई, नागपूर, औरंगाबाद, मालेगाव इत्यादी जिल्हे रेडझोन मध्ये आहेत. मोठे औद्योगिक क्षेत्र या जिल्ह्यात किंवा जिल्ह्याला लागून आहेत. महापालिका नगरपालिका व रेडझोन बाहेरील क्षेत्रात असलेल्या अशा उद्योगात काम करण्यासाठी जाणारे कामगार ,कर्मचारी ,अधिकारी हे मोठ्या संख्येने रेडझोन असलेल्या शहरांमध्ये किंवा भागांमध्ये राहतात .त्यामुळे असे उद्योग सुरू केल्याने या विषाणूचा फैलाव होण्याची खूप मोठी शक्यता आहे.
- करोना विषाणू बाबत जनतेमध्ये व कामगार वर्गामध्ये भीतीचे वातावरण आहे .कामावर गेलेल्या कामगारांना गावातले लोक गावात घ्यायला तयार नाहीत, तसेच रेड झोन मधून येणाऱ्या कामगारांना कंपनीमध्ये कामावर घेण्यास विरोध होतो अशी परिस्थिती आहे.
- महाराष्ट्रामध्ये करोना विषाणूचा फैलाव व प्रभाव कमी झालेला नसून दिवसेंदिवस करोना ग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच रेडझोन जिल्ह्यांची संख्याही वाढत आहे. हॉट स्पॉट की संख्याही वाढत आहे.
म्हणून ३मे 20पर्यंत लाक डाऊन पूर्वीप्रमाणेच कडकपणे अमलात आणणे आवश्यक आहे. सध्या सुरू असलेले अत्यंत आवश्यक उद्योगच सुरू ठेवावेत व इतर उद्योग व आर्थिक व्यवहार सुरू करू नयेत असे आमचे मत आहे. कामगार व जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने असा निर्णय करणे आवश्यक आहे, अशी मागणी सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, राज्य सरचिटणीस एम. एच. शेख यांनी केली आहे.
















