डोंबिवली : ‘केल्याने होत आहे, आधी केलेच पाहिजे’ या म्हणीचा सार्थ उपयोग करीत नगरसेविका भारती राजेश मोरे यांनी सुवर्णा संतोष केणे उद्यान नावाने ‘ग्रीन गार्डन’ तयार केले. प्रभागातील नागरिकांना पर्यावरणाच्या होणाऱ्या गंभीर परिणामाला या गार्डनमुळे थोडासा दिलासा मिळणार आहे. पालिकेच्या पडीक जागेचा उपयोग चांगल्या कार्यासाठी होवू शकतो हे यामुळे सिद्ध झाले आहे. शनिवारी सुवर्णा केणे ग्रीन गार्डनचे लोकार्पण करण्यात आले.
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक 77 च्या नगरसेविका भारती राजेश यांच्या प्रयत्नाने पूर्वेकडील आयरेगांव विभागात सुसज्ज ग्रीन गार्डनचे लोकार्पण शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. केंद्र सरकारच्या अमृत योजने अंतर्गत हरित क्षेत्र वाढ करण्याचे प्रयत्न यामुळे यशस्वी होत आहेत. शहराच्या महत्वाच्या महापालिका विभागातील मौजे आयरे सव्हे नं. 50 पैकी आरक्षित क्र. 58 या दुर्लक्षित दोन एकर जागेवर उभारण्यात आलेल्या हिरव्यागार गार्डनमध्ये वॊकिंग ट्रॅक, ज्येष्ठ नागरिकांसाठी आसने, मुलांसाठी क्रीडा खेळणी, हिरवीगार झाडे, औषधी वनस्पती, मनमोहक फुलझाडे अशा आनंददायक बागेची निर्मिती लक्षवेधी ठरत आहे. पूर्वी महापालिकेच्या ठराव क्रमाक 36/54 विषय क्रमाक 63 नुसार 30 जून, 2015 रोजी सदाशिव शेलार यांच्या सुचनेनुसार ठराव पास होऊन सुमारे चार वर्षांनंतर अखेर नगरसेविका भारती मोरे यांच्या अथक प्रयत्नामुळे आणि स्वतःचा नगरसेवक निधी वापरून ‘सुवर्णा संतोष केणे उद्यान’चे लोकार्पण झाले. या अनोख्या कामामुळे प्रभागातील नागरिक मोरे यांना धन्यवाद देत आहेत.