‘वाचनाचा जपा नाद ज्ञानाचा नको उन्माद, नको भेट वस्तू नको फुले भेट द्या पुस्तके चांगले
उद्याचे साहित्यिक घडविण्यासाठी शाळांना ग्रंथ भेट द्या- ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर
रत्नागिरी : वाचन चळवळ वाढली पाहिजे. उद्याचे साहित्यिक घडविण्यासाठी शाळांना पुस्तकांचा संच, ग्रंथ भेट द्यावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले.
उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आयोजित रत्नागिरी ग्रंथोत्सव 2023 चे उद्घाटन श्री. गाडेकर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर होत्या. ज्येष्ठ साहित्यिक मदन हजेरी, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, जिल्हा ग्रंथालय अधिकारी दिपक झोडगे, जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह श्रीकृष्ण साबळे आदी उपस्थित होते.
सुरुवातीला लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर ग्रंथ दालनाचे उद्घाटन करण्यात आले आहे. दीपप्रज्ज्वलनाने ग्रंथोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. श्री. गाडेकर म्हणाले, वाचन आणि भाषा चळवळीसाठी ग्रंथांचा उत्सव महत्वाचा आहे. यामधूनच ग्रंथांचा प्रसार होईल. वाचक, साहित्यिक, प्रकाशक हे ग्रंथोत्सवाची वाट पाहत असतात. ग्रंथालयाने पुढाकार घेऊन पुस्तकांचा संच द्यावा, त्यामधून उद्याचे साहित्यिक घडतील.
अध्यक्षीय भाषणात श्रीमती कीर म्हणाल्या, ग्रंथांची चळवळ हा लोकोत्सव व्हायला हवा. वाचनाने जगाकडे पहायची, जगण्याची सखोल दृष्टी मिळते. पुस्तके ही दीपस्तंभासारखी असतात, म्हणून पुस्तकांची संगत सोडू नये. वाचनाने अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. शिवाय अनुभव संपन्नता मिळते. म्हणून वाचन अंगवळणी पडायला हवे. त्यासाठी लहान मुलांना वाचनाची आवड निर्माण करा.
ग्रंथालय निरीक्षक हेमंत काळोखे यांनी शेवटी आभार प्रदर्शन केले. सोनाली सावंत यांनी यावेळी सूत्रसंचालन केले.
ग्रंथ दिंडीने ग्रंथोत्सवाची सुरुवात
सकाळी 8 वाजता जी.जी.पी.एस. हायस्कूल येथे ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. ग्रंथालय संचालक श्री. गाडेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून, ग्रंथ पुजन करुन ग्रंथ दिंडीस सुरुवात करण्यात आली. संविधान आणि ज्ञानेश्वरी हे ग्रंथ पालखीत ठेवण्यात आले होते. सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयातील विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी मोठ्या संख्येने या दिंडी मध्ये सहभाग घेतला. ढोल, झांज, लेझीमच्या वादनात, ‘वाचनाचा जपा नाद, ज्ञानाचा नको उनमाद’, ‘नको भेट वस्तू नको फुले, भेट द्या पुस्तके चांगले’, ‘वाचन केल्याने मिळते ज्ञान, दूर होते आपले अज्ञान’ असे फलक घेऊन ही दिंडी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा – शासकीय विभागीय ग्रंथालय या मार्गावर काढण्यात आली. ज्येष्ठ साहित्यिक मदन हजेरी, शिक्षण विभाग (प्राथमिक) चे कार्यक्रम अधिकारी रविंद्र कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.