मुंबई, ऑगस्ट 26, २०२१: ग्रँड मराठा फाउंडेशन या महाराष्ट्रातील स्वयंसेवक संस्थेने, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नींना व कुटुंबियांना २० शिवणयंत्रांचे वाटप केले. कुटुंबातील एकुलत्या एक कमावत्या व्यक्तीने आत्महत्या केल्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या स्त्रियांना तसेच कुटुंबियांना शिवणयंत्रांच्या स्वरूपात मदत देण्यात आली. ‘स्वाधार– शेतकरी विधवा सबलीकरण कार्यक्रम’ हा प्रकल्प या स्त्रियांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यात मदत करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. आर्थिक स्वयंपूर्णतेच्या बळावर या स्त्रिया कुटुंबाला आधार देऊ शकतील व राहणीमान सुधारू शकतील.
श्री. जगदीश जयस्वाल (मंडळ अधिकारी, यवतमाळ तालुका), श्रीमती सुजाता मनवर (तलाठी, वाई ), श्री. गोपाळ दत्ताजी नरोटे (भारतीय लष्करात मेजर या पदावर कार्यरत, वाई चे रहिवासी), श्री. भाविक ठाक (समन्वयक), श्रीमती रंजना आडे (सामाजिक कार्यकर्त्या) आणि श्री प्रकाश आरकेर (अध्यक्ष, द्रौपदी संस्था) आदींच्या उपस्थितीत शिवणयंत्रांचे वाटप करण्यात आले.
ग्रँड मराठा फाउंडेशनच्या विश्वस्त सौ.माधवी शेलटकर आणि ग्रँड मराठा फाउंडेशनचे संस्थापक श्री. रोहित शेलटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा वितरण सोहळा पार पडला.
चित्रपट निर्माते व ग्रँड मराठा फाउंडेशनचे संस्थापक रोहित शेलटकर या मदतीचे महत्त्व स्पष्ट करताना म्हणाले, “कोविड साथीचा फटका शेतकऱ्यांना अपेक्षेहून खूप अधिक बसला आहे. त्यामुळे त्यांच्यावरील कर्जाचा बोजा वाढला आहे आणि शेतकरी आत्महत्येचा दरही वाढला आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नींना मदत करण्यासाठी ग्रँड मराठा फाउंडेशनने स्वाधार हा उपक्रम सुरू केला आहे. या स्त्रियांना आपला सामाजिक व आर्थिक दर्जा सुधारता यावा आणि कुटुंबाची जबाबदारी वाहता यावी हा यामागील उद्देश आहे. येत्या काही महिन्यात लाभार्थींना शिवणकाम व टेलरिंगसंदर्भातील शिक्षण व कौशल्य विकास सुविधा पुरवण्याचे नियोजनही आम्ही करत आहोत.”