‘लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ विषयावर मान्यवरांनी मांडले विचार
छत्रपती संभाजीनगर, दि. १२ : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे कॉलेज ऑफ कॅम्युनिकेशन, कल्चर आणि मिडिया आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर सेंटर फॉर बुद्धिस्ट स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ या विषयावरील एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आज आर्यभट्ट सभागृह येथे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले.
यावेळी वरिष्ठ पत्रकार निरंजन टकले, एबीपी माझाचे पत्रकार प्रसन्न जोशी, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरु प्रा.डॉ.विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ.जॉन चेल्लादुराई, अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके व सर्व संबंधित मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना वरिष्ठ पत्रकार निरंजन टकले म्हणाले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे. केंद्र सरकारकडून जनसुरक्षा विधेयक आणले जात असून हे भयंकर आहे. एखाद्या मंत्रालयाच्या विभागाचे, अधिकाऱ्याचे नाव छापायचे असेल तर परवानगी घ्यावी लागेल. ही परवानगी मिळाली तरच आपल्याला त्यांचे नाव छापता येईल. आपल्याला दिसणाऱ्या गोष्टी मांडायच्या नाहीत तर मग काय? सरकार विरोधी असणे म्हणजे देशाविरोधी असणे नाही.
आपल्याला संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार आपण वापरणार आहोत की नाही ? आपल्याला असलेला अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा अधिकार आपण वापरला पाहिजे. यामध्ये संचार स्वातंत्र्य, जगण्याचे स्वातंत्र्य, वाचण्याचे, शिकण्याचे, लिहिण्याचे अशा प्रत्येक स्वातंत्र्याची फळे आपण रोज चाखली पाहिजेत. ती नाही चाखली तर आपण गुलामगिरीच्या वाटेवरून चालावे लागेल. संविधानानिक कर्तव्य तर आपण बजावत सरकार आणि नेते बजावत आहेत की नाही यावरही लक्ष ठेवायचे असल्याचे वरिष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी सांगितले.
यावेळी पत्रकार प्रसन्न जोशी म्हणाले, भारतामध्ये दररोज १८९ भाषांमध्ये २२००० वृत्तपत्र प्रसिद्ध होतात. तसेच आपल्या येथे ९०० दूरचित्रवाहिन्या असून यातील ३५० वृत्तवाहिन्या आहेत आणि याबरोबरच ८५० एफएम रेडियो आपल्याकडे आहेत. मीडिया हा ट्रस्टी, कोऑपरेटीव्ह आणि प्रायव्हेट लोक अशा तीन प्रकारे चालवला जातो. विशेषत: मीडिया हा नेहमीच कार्पोरेट राहिलेला आहे.
स्वतंत्र पत्रकारिता यशस्वीपणे चालवली जाऊ शकते मात्र, सुरुवातीला आपल्याला माध्यमांची आर्थिक गणिते समजून घेतली पाहिजेत. आज अनेकांनी टीव्ही चॅनेल बंद करून ते डिजिटलमध्ये आले आहेत. डिजिटल मीडियामध्ये वितरणाच्या खर्च नसतो मात्र, येथे अल्गोरिदम आणि लोकांची आवड या दोन गोष्टींची अडचण आहे. या माध्यमात ही गरज लक्षात घेऊन अधिक व्हिवज् साठी काहीही प्रसिद्ध केले जात आहे. यातून जाहिरातीचे गणिते मांडली जात असल्याचे पत्रकार प्रसन्न जोशी यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रिहाना सय्यद यांनी केले तर आभार डॉ.रामेश्वर कणसे यांनी मानले.