रत्नागिरी, प्रतिनिधी : एकजूट काय असते ते दाखवून दिलं आहे बुरंबी पंचक्रोशीतील सहा गावांमधील ग्रामस्थांनी. संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी पंचक्रोशीतील सहा गावांनी एकत्र येत कोरोना विलगीकरण कक्षाची स्थापना केली आहे. या ग्रामस्थांना साथ मिळालीय ती उद्योजक संजय भाताडे यांची. दादासाहेब सरफरे विद्यालयात हा विलगिकरण कक्ष उभारण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या प्रमुख उपस्थितीत याचं उद्घाटन झालं. सहा गावांच्या एकजुटीचं त्यांनी यावेळी कौतुक केलं. यावेळी माजी आमदार सुभाष बने, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य रोहन बने, पंचायत समिती सभापती जयसिंग माने, चिपळूणच्या माजी सभापती पूजा निकम, तहसीलदार सुहास थोरात आदी उपस्थित होते.रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यात तिसऱ्या लाटेचाही धोका आहे. जिल्ह्याची चिंता वाढवणारी बाब म्हणजे डेल्टा प्लस या नव्या विषाणूचे संगमेश्वर तालुक्यात तब्बल नऊ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झालं आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर गावागावांतही विशेष खबरदारी घेतली जात आहे.
ग्रामस्थांची एकजूट
दरम्यान कोरोनाबाधित ग्रामस्थांवर गावातच उपचार होण्यासाठी ग्रामस्थही पुढाकार घेताना पाहायला मिळत आहे. संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी पंचक्रोशीतल्या सहा गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत कोव्हीड विलगीकरण कक्ष उभारला आहे. बुरंबी पंचक्रोशी शिक्षण दादासाहेब सरफरे संस्थेच्या विद्यालयाच्या शेवटच्या मजल्यावर हे विलगीकरण केंद्र तयार करण्यात आलं आहे. संस्थेने इमारतीचा एक मजलाच उपलब्ध करून दिल्यामुळे हे शक्य झालं आहे. या ठिकाणी पन्नास बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. हा कक्ष उभारताना ग्रामस्थांच्या एकजुटीचे दर्शनही झाले. या एकजुटीला अनेकांची साथ मिळली आहे. उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते संजय भाताडे यांनी बेड , गाद्या , उशा ब्लँकेट आणि जेवणासाठीचे साहित्य अशी सुमारे सहा लाख रुपयांची मदत केली आहे.
अशी आहे व्यवस्था
या कोव्हीड विलगिकरण कक्षामुळे सहा गावातील सुमारे बारा हजार ग्रामस्थांना लाभ होणार आहे. याठिकाणी स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी प्रत्येकी दोन असे चार तर बाल रुग्णांना एक असे पाच स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आले आहेत. पन्नास सुसज्ज बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच एक मनोरंजन कक्ष सुध्द्दा ठेवण्यात आला आहे.















