रत्नागिरी, (आरकेजी) : खेड-दापोली- मंडणगड विधानसभा मतदार संघातील 53 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. कारण राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांच्यासह पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यात शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. कारण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकांवेळी त्यांनी भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मदत केल्याचं म्हटलं जात आहे.
यावेळची ग्रामपंचायत निवडणूक ही आधीच्या निवडणुकीपेक्षा वेगळी आहे. कारण थेट जनतेमधून सरपंच निवड असल्याने राजकीय वर्तुळाबरोबरच मतदारांमध्येही उत्सुकता आहे. विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून निवडणुकीकडे पाहिले जात आहे. खेड-दापोली- मंडणगड विधानसभा मतदार संघातील 53 ग्रामपंचायतींपैकी 13 ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध निवडले गेले आहेत. हे सर्व शिवसेनेचे असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. तसेच उर्वरित सर्व ग्रामपंचायतींवर भगवाच फडकेल असा विश्वास या पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे पुत्र आणि युवासेना राज्य कार्यकारीणी सदस्य योगेश कदम यांनी म्हटलं आहे. योगेश कदम हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सक्रिय झाले आहेत.
दरम्यान सूर्यकांत दळवी यांच्या भूमिकेमुळे या ग्रामपंचायत निवडणुकांवर कोणताही फरक पडणार नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकांवेळी त्यांनी उघडपणे भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मदत केली त्यामुळे आजच्या घडीला एकही शिवसैनिक त्यांच्या मागे उभा नसल्याचं योगेश कदम यांनी म्हटलं आहे. तसेच राष्ट्रवादीकडची निम्मी गावं हि शिवसेनेत आल्याचंही योगेश कदम यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता कोणकोणत्या ग्रामपंचायतींवर कोणत्या पक्षाचं वर्चस्व राहते, हे निवडणुकांनंतरच स्पष्ट होईल.