रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील 7 पैकी 5 ग्रामपंचायतींवर सेनेनं वर्चस्व मिळवत पाचही ठिकाणी शिवसेनेचा सरपंच विराजमान झाल्याचा दावा शिवसेनेनं केला आहे, तर 2 ग्रामपंचायतींवर गाव पॅनलंच्या ताब्यात आहेत.
दुसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यातील 8 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली होती. पैकी एका ग्रामपंचायतींची निवडणूक मतदार संख्येअभावी रद्द करण्यात आली होती. तर राजापूर तालुक्यातील सहापैकी कळसवली व हसोळ तर्फ सौंदळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासह सदस्यपदाची निवडणूक याअगोदरच बिनविरोध झाली होती. त्यामुळे राजापूरमधील सौंदळ, नाणार, हातिवले, मिठगवाणे, वाटूळ तसेच मंडणगड तालुक्यातील सडे ग्रामपंचायतीसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली. आज मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये सडे ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदी शिवसेनेच्या कवीता जगताप विजयी झाल्या आहेत. तर राजापूर तालुक्यातील बिनविरोध झालेल्या 2 ग्रामपंचायतींसह एकूण 6 पैकी 4 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. उर्वरित 2 ग्रामपंचायतींवर गाव पॅनलने आपले वर्चस्व राखले आहे. दरम्यान हसोळ तर्फे सौंदळ येथे श्रेया संतोष जाधव, हातीवले येथे सायली संतोष धालवलकर, वाटुळ येथे अभय शशिकांत चव्हाण तर मिठगवाणे येथे बलवंत सुतार हे शिवसेनेचे सरपंच विराजमान झाल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.