रत्नागिरी : आपल्या घरातील आपले आई वडीलांसाठीच आपण काम करत आहोत असे समजून शासनाकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी ०९ जुलै २०१८ रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी असे रत्नागिरी चे आमदार उदय सामंत यांनी सांगितले.
मधुरा हॉटेल, थिबा पॅलेस रोड,रत्नागिरी येथे ज्येष्ठ नागरिक, अधिकारी समवेत आयोजित चर्चासत्राच्या वेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक देवकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पाताडे, जिल्हा आरोग्य अधिकारी आठल्ये, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे जोशी, जिल्हा ग्रंथालयाचे जगताप, डॉ. श्रींरंग कद्रेकर तसेच अन्य विभागांचे अधिकारी आणि ज्येष्ठ नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार उदय सामंत म्हणाले ज्येष्ट नागरिकांचे समाजातील स्थान लक्षात घेता त्यांना वृध्दापकाळ चांगल्या तऱ्हेने घालविता यावी, समाजामध्ये त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, शारीरीक व मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावे, वृध्दापकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता,कामाचा हक्क, सार्वजनिक शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून 09 जुलै 2018 रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णयाची अमलबजावणी आपण आपल्या घरातील आईवडीलांसाठी हे काम करत आहोत असे समजून करावी.
प्रत्येक माध्यमिक शाळेमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या बाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये शिबीराचे आयोजन करण्याचे नियोजन करावे, स्वांतत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन यासारखे राष्ट्रीय सण ज्येष्ठ नागरकिांच्या उपस्थित साजरे करावेत अशा सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना आमदारांनी यावेळी दिल्या. दर तीन महिन्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालय, उपजिल्हारुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करावे, शासन निर्णयामध्ये नमूद निकषाच्या आधारे परिपत्रक काढून खाजगी रुग्णालयाना ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवा उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी संबधित आरोग्य अधिकारी यांना केल्या. शासन निर्णयामध्ये असलेल्या प्रत्येक शासकीय यंत्रणने पत्रकार परिषद घेऊन त्यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी पुरविण्यात जाणाऱ्या सुविधा माहिती द्यावी व त्याला व्यापक प्रसिध्दी द्यावी अशा सूचनाही त्यांनी केल्या.