रत्नागिरी, ( विशेष प्रतिनिधी) : आजपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी तीन दिवस संपाची हाक दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 18 ते 20 हजार कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे आज रत्नागिरीतल्या विविध सरकारी कार्यालयामध्ये या संपामुळे शुकशुकाट होता. याची झळ सर्वसामान्य नागरिकांना बसली.संपकरी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर देखील निदर्शने केली
7 वा वेतन आयोग आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून राज्य सरकारी कर्मचारी तीन दिवसांच्या संपावर गेले आहेत. 7 वा वेतन आयोगाबरोबरच अंशदायी पेन्शन योजना रद्द करा. 1 जानेवारी 2018 पासूनचा महागाई भत्ता थकबाकीसह मंजुर करा. पाच दिवसांचा आठवडा, निवृत्तीचे वय 60 वर्षे करा. रिक्त पदे ताबडतोब भरा, अनुकंपा भरती करा. केंद्रापमाणे 2 वर्षांचीच बालसंगोपन रजा महिला कर्मचाऱयांना द्या अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. या संपात राज्यातील सुमारे 19 लाख शासकीय कर्मचारी, जि.प.चे कर्मचारी निम सरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील जवळपास 18 ते 20 हजार कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. जिल्ह्यातील कोषागार कर्मचारी संघटना, विक्रीकर कर्मचारी, मलेरिया कर्मचारी, बांधकाम कर्मचारी, चतुर्थी श्रेणी संघटना, वाहन चालक संघटना, माध्यमिक शिक्षकेत्तर संघटना, तसेच प्राथमिक शिक्षकांच्या 10 संघटना या संपात सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या सरकारी कार्यालयांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत होता. जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती, तहसिल कार्यालय, बांधकाम विभाग अशा विविध कार्यालयात कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.