मुंबई – मविआ सरकारने शासकीय विमान नाकारल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. परंतु, कोश्यारी हे अनेक वर्षे राजकीय क्षेत्रात काम करीत आहेत. विधिमंडळ तसेच संसदेच्या दोन्ही सभागृहांत त्यांनी काम केले. केंद्रात मंत्री झाले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले तरी ते इतके चर्चेत कधीच आले नव्हते. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी आल्यापासून हा साधा माणूस या ना त्या कारणाने चर्चेत पिंवा वादात राहिला आहे. वाद निर्माण करणे हा त्यांचा स्वभाव नाही. परंतु, राज्यपालांना भाजपच्या अजेंड्यावर नाचायला भाग पाडले जात असल्याचे टीकास्त्र शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून भाजपवर निशाणा साधण्यात आले आहे.
राज्यपालाचं अधःपतन सुरू
राज्यपालच काय, मुख्यमंत्र्यांनाही खासगी कामासाठी सरकारी विमान वापरता येणार नाही. मुख्यमंत्री कार्यालय नियमानेच वागले. यात राज्यपालांशी झगडा करण्याचा प्रश्न येतोच कुठे? महाराष्ट्राचे राज्यपाल हे सन्माननीय व्यक्ती आहेतच. पण ते ज्या पदावर सध्या विराजमान आहेत त्या पदाचा मान व प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारी त्यांचीही तितकीच आहे. राज्यपालांना भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावर नाचायला भाग पाडलं जात आहे व त्यात राज्यपालांचंच अधःपतन सुरू आहे, अशा शब्दांत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर भाष्य करण्यात आलं आहे.
राज्यपाल स्वतःच्याच कासोट्यात पाय गुंतून सारखे का पडत आहेत –
राज्यपालांना सरकारी विमानातून उत्तराखंडला जाण्यास परवानगी नाकारण्यात आल्याने त्यांना ऐनवेळी विमानातून खाली उतरावं लागलं. या प्रकारामुळे महाविकास आघाडी आणि राज्यपाल तसंच भाजपसोबतच्या वादात नव्या अध्यायाची भर पडली आहे. यावर भाष्य करताना सामनाच्या अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे की, महाराष्ट्राच्या राज्यपालपदी आल्यापासून हा साधा माणूस या ना त्या कारणाने चर्चेत किंवा वादात राहिला आहे. वाद निर्माण करणे हा त्यांचा स्वभाव नाही व राज्यपालांनी तर शहाण्यासारखे वागावे असे संकेत असतानाही महाराष्ट्राचे राज्यपाल स्वतःच्याच कासोट्यात पाय गुंतून सारखे का पडत आहेत, असा प्रश्नही उपस्थित केला आहे.
अहंकारी भाषा कोणाची-
राज्यपालांच्या कार्यालयाने विमान उडवण्याची परवानगी मागितली व एक दिवस आधीच सरकारने परवानगी नाकारूनही राजभवनाने राज्यपालांना विमानात नेऊन का बसवले? असा हटवादीपणा करण्याचे कारण काय?मुख्यमंत्री कार्यालय नियमानेच वागले. यात राज्यपालांशी झगडा करण्याचा प्रश्न येतोच कुठे? पण महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हा विमान-वाद वेगळ्याच हवेत उडवू लागले आहेत. राज्यपालांना विमान नाकारलं हा सरकारचा अहंकार असल्याचा टोला देवेंद्र फडणवीस यांनी मारला. भाजप नेत्यांच्या तोंडात अहंकाराची भाषा शोभत नाही. सध्या अहंकाराचे राजकारण कोण करीत आहे ते संपूर्ण देश जाणतोय. दिल्लीच्या सीमेवर दोनशे शेतकऱ्यांनी प्राणार्पण करूनही सरकार कृषी कायद्यांबाबत मागे हटायला तयार नाही. त्यास अहंकार नाही म्हणायचे तर काय? असा अप्रत्यक्ष टोलाही पंतप्रधान मोदी यांचे नाव न घेता भाजपला लगावला आहे.
राज्यपालांना राजकीय कळसूत्री बाहुल्याप्रमाणे कुणी नाचवणार असेल तर तो घटनेचाही अपमान आहे. राज्यपाल हे पूर्वाश्रमीचे संघ विचारक, प्रचारक असण्याशी महाराष्ट्राला देणेघेणे नाही. अर्थात ते त्या विचारांचे असल्यानेच त्यांना हेरून महाराष्ट्राच्या राजभवनात पाठवले आहे. महाराष्ट्र त्या विचारांचाही आदर करतो. पण भाजपच्या सत्तेचा डाव मोडला म्हणून महाराष्ट्रातील आघाडी सरकारला संधी मिळेल तेव्हा आडवे जाणे घटनेच्या कोणत्या कलमात बसते? महाराष्ट्र सरकारने एखाद्या गुन्हेगारावर कारवाई केली की, त्या गुन्हेगाराच्या बाजूने भाजपने काव काव करायची व लगेच राजपालांनी त्या व्यक्तीस सन्माननीय अतिथी म्हणून चहापानास बोलवायचे हे कोणत्या घटनात्मक संस्कृतीत बसते? असा सवालही समानातून विचारण्यात आला आहे. भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया येणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.