
रत्नागिरी : गोवर रुबेला लसिकरणांचे शुभारंभ आज दामले विद्यालय, नगर परिषद शाळा क्रमांक 15,मारुती मंदीर, रत्नागिरी येथे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहूल पंडित, जिल्हा शल्य चिकित्सक देवकर, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुध्द आठल्ये, निवासी वैद्यकीय अधिकारी चंद्रकांत शेरखाने रत्नागिरीचे मुख्याधिकारी अरविंद माळी, विलास चाळके आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी खासदार विनायक राऊत म्हणाले गोवर रुबेलाचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी शासनाने गोवर रुबेला लसिकरण मोहिमेचा उपक्रम हाती घेतले आहे. आज पासून पुढील पाच आठवडे हा लसिकरण मोहिम सुरु राहणार आहे. निरोगी, सदृढ आणि कार्यक्षम जीवन जगण्यासाठी व गोवर रुबेला सारख्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी 09 महिने ते 15 वर्षे पर्यंतच्या बालकांनी, मुलांनी ही गोवर रुबेला लस घ्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शासनाकडून राबविण्यात येणारा हा उपक्रम आपल्यासाठी , आपल्या पाल्यांसाठी असून 09 महिने ते 15 वर्षे वयोगटातील आपल्या मुलांना गोवर रुबेला लस द्यावी तसेच यापासून कोणीही वंचित राहणार याची दक्षता घ्यावी असे आवाहन पालकांना खासदार विनायक राऊत यांनी केले.
यावेळी दामले विद्यालयात इयत्ता पहिलीमध्ये शिकणारी ईशा सावंत ही आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाली अनेक आजारांवर आपण विज्ञानाच्या माध्यमातून विजय मिळविला आहे. गोवर रुबेला पासून होणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी मी ही लस घेत आहे आपण सर्वांनी गोवर रुबेला लस घ्यावी, असे आवाहन तिने आपल्या वयोगटातील मित्रांना केला.
दामले विद्यालयाच्या मुख्याध्यापक जाधव यांनी प्रास्ताविकामध्ये शासनाचे गोवर रुबेला लसिकरणांच्या जिल्हयाच्या शुभांरभाचे कार्यक्रम दामले विद्यालय येथे घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले.














