मुंबई : बोरिवली पश्चिम येथील गोराई कांदळवन उद्यानामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल, या अभिनव प्रकल्पाच्या माध्यमातून कांदळवनांचे संवर्धन तर होईलच पण हा प्रकल्प फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर देशासाठी पर्यावरणाच्यादृष्टीने एक आदर्श ठरेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केला. कांदळवन पर्यटनामुळे कांदळवन जपले जाण्याबरोबरच समुद्र किनारी राहणाऱ्या लोकांना सुरक्षिततेची भावना कांदळवनाच्या माध्यमातून निर्माण होईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हयाचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी आज सांगितले.
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून बोरीवली पश्चिम गोराई येथील कांदळवन उद्यानाची (मॅग्रोव्ह पार्क) ची निर्मिती करण्यात येत आहे. भारतातील दुस-या व महाराष्ट्रातील या पहिल्या अभिनव प्रकल्पाचा भूमीपूजन शुभारंभ आज केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत अटल स्मृती उद्यान येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आला.
तावडे म्हणाले की, भारताचे पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा आज पहिला स्मृतीदिन आहे आणि या स्मृतीदिनाच्या निमित्ताने हा प्रकल्पाचे भूमीपूजन होत आहे. मुंबईसारख्या शहराला असणारा त्सुनामीचा धोका कमी होण्यास या कांदळवनाची मदत होणार आहे. खाडी म्हटली की आपल्या डोळयासमोर जे येतं ते कचरा, घाण टाकण्याचे ठिकाण. केरळ राज्यात याच खाडीला बॅकवॉटर म्हणतात आणि केरळने बॅकवॉटर पर्यटन अत्यंत उत्तमपणे सक्षम केले आहे. याच बॅकवॉटरच्या जोरावर या राज्याचे पर्यटन वाढले. याच धर्तीवर महाराष्ट्रात काही करता येईल का असा विचार होता, गोराई परिसराची पाहणी करताना गोराई खाडीमधील कांदळवन दिसली आणि मग या कांदळवनाचे संवर्धन कसे करता येईल, याचा विचार सुरु झाला. त्यानंतर जिल्हा विकास निधीच्या माध्यामतून या कांदळवनाचा विकास करण्याची योजना आखली व कांदळवन उद्यानाचा हा प्रकल्प हाती घेतल्याचे श्री. तावडे यांनी यावेळी सांगितले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले की, अटलजी यांनी मला कायम राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रवाद याबाबत सांगितले आणि आपण त्याच विचारावर चालत आहोत. सॉलिड वेस्ट आणि लिक्वीड वेस्ट मॅनेजमेंट यातून शहरांचा विकास करता येऊ शकतो. एवढच नाही तर सॉलिड वेस्ट आणि लिक्वीड वेस्ट मॅनेजमेंटच्या माध्यमातून योजनात्मक काम केल्यास याचे परिवर्तन वेल्थ मॅनेजमेंट मध्ये होऊ शकतो. मुंबई सह महाराष्ट्राला जल प्रदूषण व वायू प्रदूषण याचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केल्यास व पर्यावरण पूरक प्रकल्प व योजना हाती घेतल्यास मुंबई आगामी काळात जल व वायू प्रदूषणापासून मुक्त होऊ शकते. आज भूमीपूजन होत असलेल्या कांदळवन प्रकल्प हा एक आदर्श प्रकल्प आहे. विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून पूर्णत्वास नेणारा हा प्रकल्प पर्यावरण पूरक तसेच कांदळवनाचे संवर्धन व कांदळवनाविषयी जागृती करणारा ठरणार आहे असा विश्वासही गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.
आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आज भारत देश ‘सुपर इकॉनॉमी’ च्या दिशेने वाटचाल करित आहे. असे सांगतानाच गडकरी म्हणाले की, मुंबईचा समुद्र मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाला आहे. सध्या उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुंबईच्या समुद्राला प्रदूषणाला नक्कीच मुक्तता मिळू शकते आणि मुंबईचा समुद्रही नजिकच्या काळात मॉरिशिस मधील समुद्रांसारखा प्रदूषणमुक्त व स्वच्छ न निर्मल होईल असा विश्वासही गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज अटलस्मृती उद्यानाला भेट दिली आणि या प्रकल्पाची पाहणी केली.
याप्रसंगी नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अतुल भातखळकर, आमदार भाई गिरकर, आमदार प्रविण दरेकर, आमदार विलास पोतनीस, आमदार मनिषा चौधरी यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका आदी मान्यवर उपस्थित होते.