मुंबई,31 may : कोरोनाशी सुरू असलेल्या लढाईत डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, महापालिकेचे कर्मचारी आदी कोरोना योद्धे जीव ओतून कामास लागले आहेत. हजारो खासगी क्षेत्रातील नागरिकांनी कोरोना योद्धे म्हणून शासनाशी सहकार्य करण्यासाठी तयारी दर्शविली आहे. हे सर्व सुरू असताना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना गोरेगाव शाखेने 200 कोरोना सैनिकांचे पथक सज्ज केले आहे.
प्रकृतीची साधी तक्रार असलेल्या व्यक्तिंसाठी फिवर कॅम्प सुरू करण्यात आले आहे. गोरेगाव मेडिकल असोसिएशनचे सदस्य डॉक्टर व मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याने गोरेगाव येथील उन्नतनगर शाळेत व हार्मनी मॉल येथे दररोज सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत ताप तपासणी करून रुग्णांना मार्गदर्शन केले जाते. याशिवाय हे कोरोना सैनिक रुग्णालयांमध्ये दाखल होण्यासाठी रुग्णांना मदत करणे, टाळेबंदीमळे नागरिकांची खोळंबलेली कामे मार्गी लावण्यासाठी प्रशासनाशी समन्वय ठेवणे आणि तणावग्रस्तांना समुपदेशन करून धीर देणे तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढिवणाऱ्या औषधांचे वाटप करणे आदी कामांमध्ये व्यग्र झाले आहेत. कोरोना सैनिकांना मास्क, सॅनिटायझर्स व पीपीए किट्सचाही पुरवठा करण्यात येत आहे.