मुंबई : भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात बहुजन चेहरा देण्यात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी फार महत्त्वाची भूमिका बजावली. राज्यात आज भाजपाचे सरकार आहे, त्यामागे मुंडे यांचे मोठे योगदान आहे, अशा शब्दांत राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना त्यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईत आदरांजली वाहिली.
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या ते बोलत होते. राज्याचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता,आमदार भाई गिरकर, मनिषा चौधरी, प्रवीण दरेकर, मुंबई भाजपा सरचिटणीस सुनील राणे, प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी, प्रदेश प्रवक्ते मधू चव्हाण व अतुल शाह, दीव- दमणचे प्रभारी रघुनाथ कुलकर्णी व ज्येष्ठ नेते मुकुंदराव कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.
विनोद तावडे म्हणाले की, एकेकाळी जनसंघ – भाजपावर ज्या मुद्द्यांवरून टीका होत असे ते सर्व मुद्दे मुंडे यांनी आपल्या कर्तृत्वाने खोडून काढले. त्यांनी भाजपाला बहुजन समाजाचा चेहरा दिला तसेच सत्ता मिळाल्यावर समर्थपणे प्रशासन चालवले. ते पक्ष, सरकार आणि जनसमुदायाला योग्य दिशेने नेणारे नेते होते.
प्रकाश मेहता म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या संघर्षमय जीवनात अनेक कठीण प्रसंगांना तोंड देत काम केले. त्यांनी भाजपाच्या माध्यमातून बहुजन समाजाला एकत्र केले. त्यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसींना स्थान मिळवून दिले. त्यांनी केलेल्या कार्यामुळे राज्यात राजकीय स्थितीत बदल झाला आणि भाजपाचे सरकार आले. आज हा बदल पाहण्यात ते आपल्यात नाहीत. आपले सरकार त्यांनी दाखविलेल्या मार्गावरून वाटचाल करत आहे.
सुनील राणे म्हणाले की, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना भाजपाच्या कार्यकर्त्यांबद्दल आपुलकी होती. कार्यकर्ता अडचणीत आला तर सर्व मर्यादा ओलांडून त्याच्यापर्यंत पोहचणे व त्याला मदत करणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते.
मधू चव्हाण यांनी सांगितले की, राज्यात भाजपाला घेरण्यासाठी सर्व विरोधक एकवटले असताना आपण अधिक शक्तीने काम करण्याची गरज आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना अभिप्रेत असलेले काम करणे हीच त्यांना श्रद्धांजली आहे.