(ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या फेसबुक वॉलवरून साभार)
शरद पवार यांना विरोध या सूत्राच्या आधारे महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकांनी करिअर केले. ग्रामपंचायतीवर निवडून येण्याची क्षमता नसलेल्या नेत्यांना काँग्रेसने केवळ पवारांचा विरोधक या एकमेव निकषावर राष्ट्रीय पातळीवरची पदे दिली. विरोधी पक्षातही अनेकांनी पवार यांना टार्गेट करून आपले राजकीय बस्तान बसवले. गोपीनाथ मुंडे यांनीही महाराष्ट्र भाजपचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर शरद पवार हेच आपले टार्गेट ठेवले आणि राजकीय पातळीवर त्यांच्याशी कधीच तडजोडीची भूमिका घेतली नाही. अनेकदा मुंडे यांचा पवारविरोध हा शत्रुत्वाच्या पातळीवर गेल्यासारखा वाटत होता, परंतु दोन्ही नेत्यांची समज एवढी पक्की होती, की जेव्हा जेव्हा ऊसतोडणी कामगारांचा किंवा साखर कारखानदारीसंबंधी कोणताही प्रश्न निर्माण झाला, तेव्हा दोघांनीही जाहीरपणे एकत्र येऊन चर्चा केली. मार्ग काढला.
पवारांवर टीका करणारे, त्यांचा द्वेष करणारे अनेक आहेत. त्यांच्याविरोधात कारस्थाने करणारे अनेकजण आहेत. अशा अनेकांनी राजकीय पातळीवर अनेकदा पवारांशी तडजोडी केल्या. गोपीनाथ मुंडे हे राजकीय पातळीवर पवारांशी कधीही तडजोड न करणारे नेते होते. सुरुवातीला त्यांनी घेतलेली पवारविरोधाची राजकीय भूमिका अखेरच्या क्षणापर्यंत कायम ठेवली. मुंडे यांचा पवारविरोध कधी संशयास्पद वाटला नाही.
शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे यांच्या राजकारणाकडे बारकाईने पाहिले तर एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे गोपीनाथ मुंडे हे शरद पवार यांचे कट्टर विरोधक होते तसेच ते पवार यांचे उत्तम अनुयायीसुद्धा होते. अनुयायी म्हणजे भक्त किंवा समर्थक नव्हे. एखाद्या व्यक्तिला विरोध करताना तिची शक्तिस्थाने तसेच मर्यादा किंवा दुबळ्या बाजूही ठाऊक असाव्या लागतात. मर्यादांवर मात करण्याबरोबरच शक्तिस्थाने आत्मसात करण्याचाही प्रयत्न करावा लागतो. अर्थात अशा प्रयत्नांमध्ये शंभर टक्के यश कधीच कुणाला मिळत नाही. मुंडे यांनाही ते मिळणे शक्य नव्हते. शेवटी शरद पवार हे शरद पवार आहेत आणि गोपीनाथ मुंडे हे गोपीनाथ मुंडे होते. शरद पवार यांना यशवंतराव चव्हाण यांची शिकवणी मिळाली होती आणि गोपीनाथ मुंडेंना वसंतराव भागवत आणि प्रमोद महाजन यांची. त्यामुळे तेवढा फरकही राहणारच. पवार यांना छोट्या प्रमाणात का होईना कौटुंबिक राजकीय वारसा होता आणि ते समाजाच्या मुख्य प्रवाहातले होते. तर मुंडे कोणताही राजकीय वारसा नसलेले आणि उपेक्षित समाजातून पुढे आले होते. यशवंतराव चव्हाण यांच्या मर्यादा लक्षात घेऊन पवार यांनी त्यावर मात केली होती, त्याप्रमाणेच मुंडे यांचा आपल्या वाटचालीत पवार यांच्या मर्यादांवर मात करण्याचा प्रयत्न होता. प्रमोद महाजन यांच्यानंतर भाजपमध्ये मुंडे यांच्या शब्दाला तितकेसे महत्त्व नव्हते, किंबहुना त्यांना डावलण्याचेच प्रयत्न असायचे. मुंडे यांच्याकडे राज्यात किंवा केंद्रात कोणतीही सत्ता नव्हती, तरीही मुंडे यांनी पक्षातील आपल्या सर्व अनुयायांना बांधून ठेवले होते. हा मुंडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा करिश्मा होता. स्वतः अडचणीत असले तरी आपल्या समर्थकांना विश्वास देण्याची क्षमता त्यांच्याकडे होती. शरद पवार यांचे अगदी उलटे असते, आपल्या समर्थकांना विश्वास देण्यात ते नेहमी कमी पडतात. किंबहुना अत्यंत निकटच्या कार्यकर्त्यालाही त्यांच्याबद्दल विश्वास वाटत नाही. मुंडे यांनी पवारांच्या या मर्यादेवर मात करून प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या समर्थकांना बांधून ठेवण्याचे कसब साधले होते. त्यांना पक्षातील पदे मिळण्यासाठी ते स्वतःचे पद पणाला लावत होते.
वसंतदादा पाटील यांच्यानंतर गावपातळीवरच्या कार्यकर्त्यांना नावानिशी ओळखणारे नेते म्हणून पवार यांची ओळख होती. पवारांच्या या गुणाचे अनुकरण करताना मुंडे यांनीही गावोगावी अठरापगड जातीचे कार्यकर्ते जोडले होते आणि ते सगळ्यांना नावानिशी ओळखत होते. सार्वजनिक ठिकाणी त्यांचा उल्लेख करून त्यांना मोठेपणा देत होते. नेमके याच काळात पवार राष्ट्रीय राजकारणात व्यस्त बनत चालले होते आणि त्यांचा कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क तुटायला सुरुवात झाली होती.
स्वतःच्या मतदारसंघाची घट्ट बांधणी पवारांप्रमाणेच मुंडे यांनीही केली होती. म्हणूनच प्रारंभीचा एक पराभव वगळता मुंडे यांनी कधी पराभव पाहिला नाही. दरवेळी मुंडे अडचणीत असल्याचे चित्र निर्माण केले जायचे, परंतु मुंडे सहीसलामत निघायचे. तळागाळातल्या घटकांशी जोडून घेणे किंवा उपेक्षित समाजघटकातल्या कार्यकर्त्यांना ताकद देऊन सोशल इंजिनीअरिंगचे प्रयोग पवार यांनी अनेकदा केले, मुंडे यांनीही त्याचे अनुकरण करतच भारतीय जनता पक्षाला व्यापाऱ्यांच्या पेढीपासून दुर्गम वाडी -वस्तीपर्यंत नेले. विविध जाती-धर्मातल्या कार्यकर्त्यांना जोडून पक्षाचा सामाजिक पाया विस्तारला. पक्षाचा चेहरा बदलला. राजकारण करायचे तर पर्यायी सत्तास्थाने असायला हवीत, या शरद पवारांच्या धोरणाचे अनुकरण करताना सत्तेत आल्यानंतर मुंडे यांनीही कारखानदारीमध्ये लक्ष घातले.
राजकारण करतानाही काही गोष्टींसाठी सत्तेची किंमत द्यायची असते. राज्यातील सत्तेची किंमत देऊन शरद पवार यांनी मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. मुंडे यांनीही पक्षाच्या धोरणाविरुद्ध जाऊन अनेकदा पावले उचलली. भाजप देशभर मंडलविरुद्ध कमंडलूची लढाई करीत असताना मुंडेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र भाजपने मात्र मंडल आयोगाच्या समर्थनाची भूमिका घेतली होती. सगळा संघपरिवार गणपतीला दूध पाजण्याचे पुण्यकर्म करीत असताना मुंडे यांनी जाहीरपणे हे थोतांड असल्याची भूमिका घेतली होती. सत्तेत असताना राजधर्म पाळायला हवा, अशी धारणा त्यांच्याकडे होती. म्हणूनच तर छगन भुजबळ यांच्या घरावर शिवसैनिकांनी हल्ला केल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी त्याचे अप्रत्यक्ष समर्थन केले होते. मुंडे यांनी मात्र गृहमंत्री या नात्याने भुजबळ यांच्या घरी भेट देऊन राजधर्माचे पालन केले होते.
शरद पवार हे दांडगा लोकसंपर्क असलेले नेते आहेत आणि चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या महाराष्ट्राची नस न् नस जाणतात. तिथल्या प्रश्नांची जाणीव त्यांना आहेच शिवाय राज्याच्या कानाकोपऱ्यात त्यांना मानणारे नेते, कार्यकर्ते आहेत. पवारांप्रमाणेच महाराष्ट्र कवेत घेण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या मुंडे यांनी स्वतःला मराठवाड्याचे नेते म्हणून कधीच प्रोजेक्ट केले नाही. महाराष्ट्राचे नेते म्हणून आपली प्रतिमा निर्माण करण्याचा आणि जपण्याचा कसोशीने प्रयत्न केला. म्हणून तर मुंबईत आणि पुण्यात आपल्या समर्थकाला पदे मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली. शरद पवार यांचे राजकीय साम्राज्य खिळखिळे करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात मजबूत बांधणी केली. राजू शेट्टींना महायुतीत घेऊन पवारविरोधी राजकारणाची धार तीव्र केली. विदर्भात पांडुरंग फुंडकर, नाना पटोले यांच्यासारख्या नेत्यांना बळ दिले. खानदेशात एकनाथ खडसे यांना ताकद देण्याची भूमिका घेतली.
शरद पवार यांच्या पक्षात आणि काँग्रेसमध्येही त्यांची जवळची माणसे किंवा त्यांच्यानंतरच्या पिढीतले त्यांचे खूप अनुयायी आहेत. परंतु शरद पवार यांच्यासारखी सामाजिक समज असलेला नेता त्यांच्यामध्ये नाही. तेवढी नसेल परंतु त्याच्या जवळपास जाण्याइतकी समज गोपीनाथ मुंडे यांच्याकडे होती. पवारांसारखी सांस्कृतिक समज नसली तरीही सांस्कृतिक क्षेत्राविषयी, तिथल्या माणसांविषयी आस्था होती आणि सत्तेत असताना अनेकदा ती दिसून आली. मुंडे यांच्या एकूण राजकीय वाटचालीचे सूक्ष्मपणे अवलोकन केले, तर ते पवारांचे जेवढे कट्टर विरोधक होते, तेवढेच चांगले अनुयायी होते हे लक्षात येते. शरद पवारांचा इतका चांगला अनुयायी महाराष्ट्राच्या राजकारणात दुसरा कुणी दाखवता येत नाही.