मुंबई : गोल्डन जॅकेल हा कोल्हा प्रजातीचा प्राणी विक्रोळीतील फिरोजशहानगरात आज बुधवारी (ता. २४) संध्याकाळी एका खड्यात पडलेला आढळला. स्थानिकांनी याबाबत रॉ या प्राणी मित्र संघटनेला फोन करून माहिती दिली. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत या कोल्ह्याला जीवदान देत वनविभागाच्या हवाली केले.
तत्पूर्वी स्थानिक नागरिकांना गोल्डन जॅकेल पडलेला आढळल्यानंतर तो पळून जाऊ नये, म्हणून खड्ड्यावर फळी ठेवण्यात आली होती.
रॉ चे विवेक सेठिया, चिन्मय जोशी , पवन शर्मा, प्रतीक भानुशाली इत्यादी कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी त्याला बाहेर काढून त्याला वनविभागाच्या हवाली केले.
गोल्डन जॅकल कांदळवनांच्या विभागात मोठ्या प्रमाणात आढळतो. पूर्व द्रुतगती मार्गाला लागून मोठ्या प्रमाणात ही वने असल्याने गोल्डन जॅकल या ठिकाणावरून आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या ठिकाणी या अगोदरही कोल्ह्यांचा वावर असल्याचे नागरिकांनी पहिले आहे. परंतु अश्या प्रकारे पहिल्यांदाच गोल्डन जॅकल पकडला गेला आहे.
आजूबाजूला खारफुटीचे जंगल असल्याने रस्ता चूकून गोल्डन जॅकल या ठिकाणी आला असावा, त्याच्यावर किरकोळ उपचार करून वनविभागाकडे सुपूर्द करण्यात आले, असे रॉ या प्राणी संघटनेचे प्रतीक भानुशाली म्हणाले.