मुंबई, ८ जून २०२१: धातूचा सर्वाधिक वापरकर्ता असलेल्या चीनकडून सततच्या घटत्या मागणीमुळे तेल आणि औद्योगिक धातू कालच्या व्यापारी सत्रात दबावाखाली दिसून आले असल्याचे एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.
सोने: अमेरिकेच्या आर्थिक आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर, डॉलरचे दर कमी झाले. परिणामी सराफा धातू इतर चलनधारकांसाठी अधिक आकर्षक ठरला. सोमवारी, स्पॉट गोल्डचे दर ०.५ टक्क्यांनी वाढले आणि १८९९ डॉलर प्रति औसांवर स्थिरावले. अमेरिकी फेडरल रिझर्व्हने अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्याकरिता व्याज दर जवळपास शून्य ठेवले आहेत. मात्र, व्याजदरात वाढ झाल्यास सोन्यासारख्या मालमत्तेत गुंतवणूक करण्याची शक्यता वाढेल. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेची निरंतर सुधारणा होत असल्याने डॉलरला बळकटी मिळाली. परिणामी आठवड्याच्या सुरुवातीला सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्याच्या दरात घसरण झाली.
कच्चे तेल: आठवड्याच्या पहिल्या व्यापारी दिवसात डब्ल्यूटीआय क्रूडचे दर ०.६ टक्क्यांनी घसरले आणि ६९.२ डॉलर प्रति बॅरलवर आले. तेलाच्या मागणीत सुधारणेबाबत शंका आणि चीनच्या कमकुवत व्यापारी आकडेवारीमुळे क्रूडच्या दरांवर दबाव आला. चीनकडून पर्यावरणाबाबत कठोर नियमांच्या पार्श्वभूमीवर तेलाचा वापर मर्यादित होऊ लागला आहे. परिणामी चीनच्या क्रूड आयातीत मे २०२१ मध्ये १४.६ टक्क्यांची घट झाली. प्रमुख तेल उपभोक्ता असलेल्या चीनकडून मागणीत घट झाल्याने बाजाराच्या भावनांवर परिणाम झाला आणि तेलाचे दर घसरले.
बेस मेटल्स: धातूच्या प्रमुख उपभोक्ता असलेल्या चीनच्या अर्थव्यवस्थेकडून मागणीत घसरणीच्या चिंतेमुळे या आठवड्याच्या पहिल्या व्यापारी दिवसात बहुतांश औद्योगिक धातू दबावाखाली राहिले. औद्योगिक क्षेत्रात नुकसानीचे संकेत दिसत असल्यामुळे चीनच्या निराशाजनक व्यापारी आकडेवारीमुळे बाजाराच्या भावनांवर आणखी परिणाम झाला. चीनची निर्यात मे २०२१ (वार्षिक) मध्ये २७.९ टक्क्यांनी वाढली, मात्र अपेक्षित वृद्धीपेक्षा कमी दिसून आली.. एप्रिल २०२१ मध्ये ३२.३ टक्क्यांची वृद्धी घेतली होती. चीनमधील आयातीत धातूवरील प्रीमियममध्ये घट झाल्याने मागणीतही घसरण झाली. परिणामी अपेक्षापेक्षा कमकुवत निर्यात आकडेवारी नोंदवली गेली.