Talasari : पालघर जिल्ह्यातील आदिवासी प्रगती मंडळाच्या सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि उच्च महाविद्यालयांनी १४ ऑगस्ट २०२१ रोजी कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, तलासरी येथे गोदूताईंची ११४वी जयंती उत्साहात साजरी केली. लॉकडाऊनमुळे यंदा दरवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांची मोठी मिरवणूक, सांस्कृतिक कार्यक्रम, जाहीर सभा हे काहीही करता आले नाही. त्यामुळे लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून कॉलेजच्या मोठ्या सभागृहात सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या समारंभात गोदूताईंच्या आठवणी आणि कर्तृत्वाला उजाळा दिला.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते गोदूताईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्व प्रमुख मान्यवरांचे स्वागत केले तर प्रा. रावसाहेब पवार यांनी संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. याप्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते “गोदावरी” या महाविद्यालयाच्या वार्षिकांकाचे विमोचन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांनी केले. आपल्या प्रास्ताविक भाषणात गोदूताईंनी लिहिलेल्या ‘जेव्हा माणूस जागा होतो’ या पुस्तकाचे प्रकाशन हक्क आदिवासी प्रगती मंडळाकडे वर्ग व्हावेत जेणेकरून हे पुस्तक कमी किंमतीत जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे शक्य होईल याकरता संघटित प्रयत्न करण्याची अपेक्षा सरांनी व्यक्त केली.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते होते अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे. आपल्या भाषणात त्यांनी कॉ. गोदावरी आणि कॉ. शामराव परुळेकर यांची मार्क्सवादी विचारधारेवरील निष्ठा, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान आणि महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या स्थापनेतील पुढाकार याचे विवेचन केले. तत्कालीन ठाणे जिल्ह्यातील बड्या जमीनदार आणि सावकार वर्गाने केलेल्या अमानुष शोषणाविरुद्ध वारली आदिवासींना संघटित करून गोदूताई आणि शामरावांनी किसान सभेच्या झेंड्याखाली ज्या ऐतिहासिक वारली उठावाचे नेतृत्व केले, त्याचा परिणाम म्हणून आज येथील आदिवासी समाज स्वातंत्र्याची फळे काही प्रमाणात तरी चाखत आहे. आदिवासी प्रगती मंडळाची स्थापना आणि त्या पाठीमागे असलेल्या शामराव व गोदुताई, आचार्य अत्रे, बलराज सहानी, लहानू कोम, एल. बी. धनगर आदि मान्यवरांच्या योगदानाची आठवण त्यांनी करून दिली. जगाचा इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास असून समाजवादी परिवर्तनाच्या माध्यमातूनच शोषित समाजास न्याय मिळू शकेल याचे तपशीलवार विवेचन त्यांनी कार्ल मार्क्स लिखित ‘कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा’ या ग्रंथाचा संदर्भ देऊन केले. गोदुताई व शामरावांची मार्क्सवाद हीच प्रेरणा होती हे त्यांनी आवर्जून मांडले. भारतीय स्वातंत्र्य पंचाहत्तरीत पदार्पण करताना देशासमोरील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय आव्हाने, वाढती महागाई, कुपोषण, बेरोजगारी, दारिद्र्य, धर्मांधता, जातपातवाद, शेतकरी आणि कामगार विरोधी कायदे, जनविरोधी नवीन शैक्षणिक धोरण या सर्वांस जबाबदार असलेल्या भाजपच्या मोदी-शहा सरकारविरुद्धच्या लढाईत शिक्षक आणि कर्मचारी अत्यंत भरीव कामगिरी करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी आदिवासी प्रगती मंडळाचे सचिव बारक्या मांगात, डहाणू विधानसभेचे आमदार विनोद निकोले, किसान सभेचे राज्य अध्यक्ष किसन गुजर, जमसंच्या राज्य सरचिटणीस प्राची हातिवलेकर या सर्वांची समयोचित भाषणे झाली. संस्थेच्या विश्वस्त हेमलता कोम देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होत्या.
मंडळाद्वारे दरवर्षी विद्यार्थ्यांचा अपघाती विमा काढण्याचा एक अत्यंत अभिनव आणि संवेदनशील उपक्रम राबवण्यात येतो. यावर्षी पूरबळी झालेल्या तीन आदिवासी विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रकमेचे धनादेश यावेळी देण्यात आले.
लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची पार दैना उडाली आहे. ऑनलाइन शिक्षण आदिवासी भागात पोहोचलेले नाही. त्यामुळे आधीच कठीण असलेल्या गणित विषयाशी त्यांची नाळ तुटू नये आणि त्यांना हा विषय सोपा जावा म्हणून ‘नवनिर्मिती’ या संस्थेतर्फे पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक अभिनव उपक्रम यावेळी सादर करण्यात आला. सीटू या कामगार संघटनेचे राज्य सचिव डॉ. विवेक मोंटेरो आणि त्यांच्या सहकारी गीता महाशब्दे हे खास त्याकरता तलासरी येथे आले होते. हा उपक्रम आता संस्थेच्या सर्व शाळांत राबवण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दीपक वाकडे यांनी केले, आभारप्रदर्शन प्रा. रावसाहेब पवार यांनी, तर वृत्तांकन प्रा. माळवदकर यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.














