मुंबई : फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि तिची सीएसआर भागीदार संस्था मुकुल माधव फाऊंडेशन (एमएमएफ)ने सामाजिक विकास केंद्र सोशल डेवलपमेंट सेंटर मालाड, मुंबई येथील वंचित मुलांसाठी ‘गोलमाल अगेन’ च्या कलाकारांची एक खास भेट आयोजित केली होती. या संवादात्मक भेटीमधे ‘गोलमाल अगेन’मधील रोहित शेट्टी, परिणीती चोप्रा, अर्शद वारसी, श्रेयस तळपदे, तुषार कपूर, कुणाल खेमू उपस्थित होते. यावेळी अभिनेत्यांनी आपल्या अभिनयक्षेत्रातील वाटचालीतील अनुभवांची शिदोरी या मुलांसमोर उलगडत त्यांना विचारप्रवृत्त केले व त्यांना नवी उमेदही दिली. या कलाकारांसोबत फोटो काढून घेण्याच्या रंगलेल्या सत्रामुळे तर हा कार्यक्रम या मुलांसाठी एक कायम जपून ठेवावी अशी आठवण ठेव बनला.
सामाजिक विकास केंद्र सोशल डेवलपमेंट सेंटर, वंचित समाजगटातील मुलांसाठी काम करत आहे. सामाजिक विकास केंद्रातील ही 20 मुले फिनोलेक्सचे आयोजक तसेच मुकुल माधव फाउंडेशनचे कार्यकर्ते यांच्या सोबतीने आपल्या संस्थेमधून कार्यक्रमस्थळी आली तेव्हा मोठ्या धूमधडाक्यात त्यांची भेट आभिनेत्यांशी घालून देण्यात आली. या मुलांनी अभिनेत्यांशी फार मन:पूर्वक संवाद साधला. आपली स्वप्ने प्रत्यक्षात येऊ शकतात हा विश्वास अभिनेत्यांनी मुलांना दिला त्याचबरोबर सर्व जिल्ह्यातील मुलांच्या आरोग्याची स्थिती सुधारण्यासाठी व त्यांच्या सामाजिक भल्यासाठी एमएमएफ फाउंडेशन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे याबद्दलची आशाही त्यांच्या मानत रुजवली.
फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालिका आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू छाब्रिया म्हणाल्या, हा उपक्रम खरोखरीच आनंददायी आहे आणि इथे येऊन या मुलांची भेट घेतल्याबद्दल मी या कलाकारांचे आभार मानते. एमएमएफचे सामाजिक विकास केंद्र सोशल डेवलपमेंट सेंटरशी असलेले ऋणानुबंध फार जुने आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या संस्थेतील मुलांना स्टार मंडळींना भेटता आले आणि त्यांच्याबरोबर एक संध्याकाळ साजरी करता आली. त्यांच्या गाठीशी काही आनंदाचे क्षण जमा झाले. या मुलांची भेट त्यांच्या आवडत्या कलाकारांशी घालून देण्याचा हा प्रयत्न फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि. च्या पाठिंब्याशिवाय तडीस गेला नसता.
रोहित शेट्टी म्हणाले, आपल्या आवडत्या चित्रपट अभिनेत्यांना भेटण्याबद्दल या मुलांमध्ये ओसंडून वाहणारा उत्साह आणि कुतूहल पाहणे हा मोठा आनंद आहे. या उपक्रमामुळे या मुलांप्रमाणेच अभिनेत्यांचेही मनोबल उंचावले आहे. या खट्याळ मुलांमधील कधीही हार न मानणाऱ्या उमेदीने आणि खळाळत्या उत्साहाने या अभिनेत्यांना भरपूर सकारात्मक ऊर्जा पुरविली आहे.येथून परतताना आमच्या मनात या कार्यक्रमाच्या खूप साऱ्या आनंदी स्मृती रेंगाळत राहणार आहेत. इथे उपस्थित राहण्याची आणि या मुलांसाठी केल्या जाणाऱ्या कामाप्रती त्यांनी जपलेल्या कटिबद्धतेचे कौतुक करण्याची संधी आम्हाला दिल्याबद्दल आम्ही मुकुल माधव फाउंडेशनचेही आभार मानतो.